सावधान पवार येत आहेत

July 31, 2013 7:42 PM0 commentsViews: 3012

sandeep_chavan_

                           Post by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

असं म्हणतात की, फार फार पुर्वी जेव्हा भारतात महात्मा गांधींचा करिष्मा सुरु होता, म्हणजे नोटेवरील गांधींपेक्षा खरेखुरे गांधी जेव्हा लोकांना अधिक प्रिय होते तेव्हा त्यांना पत्र पाठवताना केवळ महात्मा गांधी एवढेच टाईप केले जायचे… ते जेथे असतील तेथे त्यांना ते पत्र पोहचेत केले जायचे… वर्ष उलटली…त्यानंतर महाराष्ट्रात काहीसं असचं एकायला मिळायचे…अगदी आजही शरद पवार कुठले म्हटले की, शाळेतला शेंबडा पोरही बारामती असं उत्तर देतो म्हणे… इतका शरद पवारांचा बारामतीशी जिव्हाळा..असं असतानाही शरद पवारांनी शेवटी मुंबईकर होण्याचं ठरवलं… आणि तेही सक्रीय राजकारणात 46 वर्ष उलटल्यानंतर…म्हणजे शरद पवारांचा दक्षिण मंुबईत तसा मोठा बंगला आहे. पण कागदोपत्री आजही पवार बारामतीकरच होते. यापुढे शरद पवारांचा पत्ता असणार आहे..बंगलो नंबर 2, सिलव्हर ओक इस्टेट, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई -26…
आजवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला हा पत्ता का स्वीकारला याचं कोडं अखेर उलगडलं…. शरद पवारांनी तब्बल 46 वर्ष राजकारणात आपला ठसा उमठविल्यानंतर आपला पत्ता निवडणूक आयोगाकडे बदलला. मतदार नोंदणी कार्यालयात फॉर्म नंबर 6 चा अर्ज दाखल केला. यानुसार आता बारामती मतदार केंद्रातील पवाराचं नाव वगळलं गेलं आणि मुंबईत ते दाखल करून घेतलं.
पवार हे बारामतीचे रहिवासी असल्यामुळे गेल्यावेळी पवारांना निवडणूक लढवता आली नव्हती. हा नियम म्हणे याआधीही अस्तित्वात होता आणि तो असतानाही पवार दहा वर्ष एमसीएचे अध्यक्ष होतेच. अचानक विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि मग पवार मुंबईकर नसल्याचा साक्षात्कार झाला गेला. आणि नोबॉलवर पवारांची विकेट काढली गेली. आता येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक होऊ घातलीय. आणि याच निवडणुकीसाठीच पवारांनी आपला पत्ता बदलून घेतला.

sharad pawar MCA

शरद पवारांनी जाहीरपणे एमसीएच्या कार्यालयातचं महिनाभरापुर्वी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. पण आजवरचा इतिहास पाहता ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं करतात. त्यामुळे ते निवडणूक नाही लढवणार म्हटले म्हणजे हमखास लढवणार असा आपण अर्थ घ्यायचा. नुकताच नाही का महाराष्ट्रात दृष्काळ चालू असताना शाही पध्दतीनं लग्न करणार्‍या आपल्याच पक्षाच्या कॅबिनेट मिनिस्टर भास्कर जाधवयांच्यावर पवारांनी जाहीर टीका केली होती. अशा लोकांनी सार्वजनिक जीवन सोडून इतर पर्यायांचा विचार करावा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारलं होतं.
पण त्यानंतर चारच महिन्यांत.. त्याच जाधवांना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं.. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली… तेव्हा शरद पवार हे मराठी मातीतीतले कसलेले पैलवान आहेत, कधी कुणाला धोबीपछाड देतील हे सांगता येणार नाहीत. तुर्तास पवार मुंबईकर झालेत. आिण आता  पवार मंुबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार ही ब्रेकिंग न्यूज ही सगळ्यांनी पािहलीय. पवारांची प्रतिक्रीयाही आताच सांगून टाकतो..पवार त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतील, क्रिकेट कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मी नाही म्हणू शकलो नाही…
पवारांच्या या प्रतिक्रीयेनंतर मीडियाची आणखिन एक कॅम्पेन सुरु होईल. पवारांनी वयाच्या 72 व्या वर्षी अध्यक्ष व्हावे का ? कारण काँग्रेसप्रणीत देशातील सरकार ज्यात शरद पवारही सामील आहे, ते जे क्रीडा बिल आणू पाहतायत त्यानुसार 70 वर्षावरील व्यक्ती कोणत्याही संघटनेचं पद भुषवू शकत नाही… पण नियम हे तोडण्यासाठीच असतात नाही का ?

 

close