महाप्रलयानंतर..

June 20, 2013 5:27 PM0 commentsViews: 1016

flood3453उत्तराखंड 20 जून : मुसळधार पाऊस, पूर, भूस्खलन अशा नैसर्गिक संकटांनी तडाखे दिलेल्या उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. केदारनाथमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी हवाई दलाने 8 हेलिकॉप्टर्स तैनात केली आहे. पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या केदारनाथमधून यात्रेकरू आणि पर्यटकांची सुटका केली जातेय. केदारनाथ आणि गोविंदघाटमधून आतापर्यंत 15 हजार जणांची सुटका करण्यात आली आहे. हवाई दलाबरोबरच लष्करही बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलंय.
उत्तराखंडमध्ये पुरानं आतापर्यंत 150 बळी घेतलेत. अजूनही हजारो जण निरनिराळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. दुदैर्वाची बाब म्हणजे त्यांच्यापर्यंत अन्न आणि औषधं अशा मूलभूत बाबी पोहोचत नसल्यानं त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गौरीकुंडमध्ये अजूनही 5000 जण अडकलेत. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आलीत.

 

लष्कराचं वैद्यकीय पथकही मदतीसाठी सज्ज झालंय. मात्र, खराब हवामानामुळे त्यात अडचणी येत आहेत. उत्तराखंडच्या पर्यटनमंत्री अमृता रावत यांनाही खराब हवामानामुळे आपला दौरा रद्द करावा लागला. दुसरीकडे, या पुराचा फटका कैलास मानसरोवर यात्रेलाही पोहोचलाय. तिकडं जाणारे सर्व रस्ते असुरक्षित झाल्यामुळे सध्या ही यात्रा बंद करण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतलाय. दरम्यान, चार धाम यात्रा पुन्हा सुरू होण्यासाठी किमान वर्षभर लागेल, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिली.

close