उत्तराखंडची आजची परिस्थिती

June 21, 2013 6:13 PM0 commentsViews: 1249

utrakhand flood 21 juneउत्तराखंड 21 जून : केदारनाथ मंदिरातल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात लष्कर आणि मदतपथकाला यश आलंय. मात्र आजूबाजूच्या परिसरात अजूनही अनेक पर्यटक सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. तिथपर्यंत अजूनही मदत पथकं पोहोचू शकलेली नाहीत. आज रमाडापर्यंत पोहोचून तिथं हेलिपॅड बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता गौरीकुंडच्या दिशेने जाणारा मार्ग खुला झालाय.

 

दरम्यान, उत्तराखंडामध्ये पूरातल्या बळींची संख्या 207 पर्यंत पोहाचली आहे. पण मृतांचा खरा आकडा काही हजारांच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होतेय. बचावकार्य पूर्ण झाल्यावरच हा आकडा समोर येईल. अडकलेल्या तेहेतीस हजार लोकांपेक्षाही जास्त लोकांची सुटका करण्यात आली असली तरीही पन्नास हजांराहून अधिक लोक अजूनही राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत.

 

उत्तराखंडमध्ये 1100 लहान मोठे रस्ते आणि मोठे महामार्ग उद्धवस्त झालेत. तर 94 पूल वाहून गेलेत. एकट्या रुद्रप्रयागमध्ये 26 पूल वाहून गेले. संपूर्णपणे सुरळीत होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधीही लागू शकतो अशी माहिती उत्तराखंड सरकारनं दिली. आतापर्यंत 33 हजार लोकांना वाचवण्यात यश आलंय. पण अजून 55 हजार लोकांना वाचवण्याचं आव्हान कायम आहे.

जनतेनं मुख्यमंत्र्यांना घेतलं चांगलंच फैलावर

गेले चार दिवस उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव आणि हतबल प्रशासन याचा सर्वाधिक फटका यात्रेकरू, पर्यटक आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय. त्यांना दिलासा देण्यात प्रशासन अपुरं पडतंय. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा जोशीमठला गेले असता, त्यांनाही याचा अनुभव घ्यावा लागला. तिथल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अडकलेले यात्रेकरू आणि त्यांचे नातेवाईक यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

close