सत्यम घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारीही सामील ?

January 15, 2009 5:34 AM0 commentsViews: 2

15 जानेवारी सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजू न्यायालयीन कोठडीत आहेत. सत्यमचा घोटाळा उघड होण्यापूर्वी कंपनीचे हजारो शेअर्स पद्धतशीरपणे विकले गेल्याची एक्स्लुजीव माहिती सीएनएन आयबीएनला मिळाली आहे. यात टॉप मॅनेजमेंटचा हात असल्याचं समजतंय. सेबी त्याची चौकशी करणार आहे. सत्यम घोटाळ्याच्या चौकशीसाठी सेबीला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. रामलिंग राजू आणि त्यांच्या गँगची चौकशी करायला कोर्टाची परवानगी मिळायला हवी. सत्यमच्या कागदपत्रांची तपासणी करायला पोलिसांनी हिरवा कंदील दाखवायला हवा. या सर्वांमुळे सत्यम प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला विलंब होणार असल्याचं सेबीच्या वकिलांनी म्हटलंय. "प्रत्येक कागदपत्रासाठी आम्हाला कोर्टाकडं अर्ज करायला हवा. आणि परवानगी घ्यायला हवी. त्यानंतर कागदपत्रं तपासायला हवीत. साहजिकच तपासात विलंब होणार" असं सेबीचे वकील प्रद्युम्न कुमार रेड्डी यांनी सांगितलं.फायनान्सिअल अकाऊंटींग घोटाळ्यात लिस्टेड कंपनीचा समावेश असल्याचं सेबीचं म्हणणं आहे. "सेबीला पहिल्यांदा सर्व माहिती दिली गेली पाहिजे. आणि तपासाची परवानगी मिळायला हवी" अशी मागणी सेबीचे वकील प्रद्युम्न कुमार रेड्डी यांनी केली आहे.सत्यमच्या अंतर्गत ट्रेडिंगमध्ये टॉप मॅनेजमेंटचा हात होता काय, या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडं सेबीला लक्ष द्यायला हवं. रामलिंग राजू यांनी सत्यमचे 14 टक्के शेअर्स गेल्या आठ वर्षांत विकले आहेत. सत्यममधला आपला हिस्सा सप्टेंबर 2008 मध्ये राजू यांनी 22.89 टक्क्यांवरून 8.27 टक्क्यांवर आणला. असं करणारे राजू हे एकटेच नाहीत. नेटवर्क-18ला मिळालेल्या माहितीनुसार सत्यममधल्या वरीष्ठ कार्यकारणितल्या 20 सदस्यांनी डिसेंबर 2008 मध्ये आपले शेअर्स विकले आहेत. त्यात सत्यमचे सीएफओ श्रीनिवास वादालमाणी आणि बोर्डाचे संचालक राम मैनापती यांचा समावेश आहे. त्यामुळेच सत्यमच्या घोटाळ्यात सत्यमच्या बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांचा हात असल्याची शक्यतै व्यक्त केली जात आहे.

close