अशीही ‘शाळा’ ट्यूशन ‘फी’वर चक्क दंड !

June 21, 2013 7:55 PM0 commentsViews: 459

सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद

20 जून : राज्याने खाजगी शाळांमधल्या फी नियंत्रणासाठी कायदा मंजूर केला. पण, अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे विद्यार्थी-पालकांची पिळवणूक होतेय. औरंगाबादमध्ये शाळेची अशीच मनमानी उघड झालीय. शाळेच्या या मनमानीकडे शिक्षण खातं ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. म्हणून मग या खाजगी शाळांनी आता मुजोरीच सुरू केलीय. औरंगाबादेतली वाय.एस.खेडकर इंटरनॅशनल शाळा ट्यूशन फी वर चक्क दंड वसूल करतेय.

औरंगाबादेतली वाय.एस.खेडकर इंटरनॅशनल स्कूल…माजी महापौर भागवत कराड यांच्या नातेवाईकांची ही संस्था. ट्यूशन फी भरायला उशीर झालेल्या विद्यार्थ्यांकडून ही शाळा दिवसाला चक्क 30 रुपयांचा दंड वसूल करतेय. नाहीतर विद्यार्थ्याला शाळेतच येऊ दिलं जात नाही. तशी नोटीसच अकाऊंट विभागात लावलीय.

आयबीएन लोकमतची टीम या शाळेत पोहचली. पण, बेकायदेशीर दंडाविषयी शाळेतलं कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं.मुख्याध्यापिकांही शेवटपर्यंत प्रतिक्रीया दिली नाही. व्यवस्थापनाच्या एका सदस्यानं तर कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला. अखेर आम्ही गाठलं शिक्षणाधिकार्‍यांना. त्यांनी हा दंड बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं.

यानंतर आम्ही याच विभागाचे उपसंचालक सुखदेव डेरे यांच्या कार्यालयात पोहचलो. तर डेरे साहेब गेले अनेक दिवस ऑफिसला येतच नसल्याचं कळलं. मग आम्ही, त्यांना फोनवरुन संपर्क साधला. शिक्षण खात्याकडे तक्रारी करूनही कारवाई होत नाही म्हणून खाजगी शाळा अशी लूट करत आहे.

close