प्रेम आधळं का असतं ते सांगणारा ‘रांझणा’

June 21, 2013 11:31 PM0 commentsViews: 2116

अमोल परचुरे,समिक्षक

‘रांझणा’ या शब्दाचा अर्थ म्हणजे जीवापाड प्रेम करणारा…खरंतर हीर-रांझा मधल्या रांझा सारख्या प्रियकरासाठी रांझणा शब्दाचा वापर होतो, तर अशा निर्मळ प्रेमाची बरसात करणार्‍या रांझणाची ही गोष्ट आहे. ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद राय यांचा हा दुसराच सिनेमा… पहिल्या सिनेमात माधवन आणि कंगना राणावत अशी कास्टिंग करणार्‍या आनंद राय यांनी दुसर्‍या सिनेमाच्या कास्टिंगमध्येही कल्पकता दाखवली आहे. टायटल रोलसाठी त्यांनी थेट दक्षिणेतील सुपरस्टार धनुषचा विचार केला.

ranjhana

अतिशय सेन्सिबल आणि विचारपूर्वक सिनेमे करणार्‍या अभय देओलला सोबत घेतलं आणि अभिनय येत नसला तरी वेळ मारुन नेणार्‍या सोनम कपूरला हिरॉईन म्हणून घेतलं. खरंतर या कास्टिंगनेच त्यांनी अर्धी लढाई जिंकलेली आहे. बाकी कितीही मोठी धावसंख्या करायची असली तर जसा एक भरवशाचा शिखर धवन लागतो तशीच तडाखेबंद कामगिरी केलीये धनुषनं आणि सामना एकहाती खिशात टाकलाय. धनुषचं, त्याच्या अभिनयाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. दक्षिणेतील अनेक सिनेमात वेगवेगळे रोल्स करुन लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला धनुष बॉलीवूडमध्ये एंट्री करताना अजिबात अवघडलेला दिसत नाही, उलट 100 कोटींची कमाई करणार्‍या, पण तद्दन दर्जाहीन सिनेमे देणार्‍या बॉलीवूड सुपरस्टार्सना तगडं आव्हान दिलेलं आहे.
काय आहे स्टोरी ?

धनुषच्या अभिनयाप्रमाणेच रांझणामध्ये महत्त्वाची आहे कथा आणि तिची मांडणी. ही सरधोपट प्रेमकथा नाही तर प्रेमात पडलेल्या रांझणाचा जीवनपटच इथं बघायला मिळतो. या नायकाचं नाव आहे कुंदन… तसा हा मूळचा तामिळनाडूचा, पण दोन पिढ्यांपासून त्याचं कुटुंब बनारसमध्ये स्थायिक आहे. कुंदनचा जन्मही बनारसचाच…तामिळ बोली येत असली तरी आता त्याच्या नसानसात बनारसमधली जीवनशैली भिनलेली आहे. वडिलांप्रमाणे तो पौराहित्य करत नाही, फारसा शिकलेला नाही पण आयुष्याच्या शाळेत त्याने बरेच धडे गिरवलेत. असा हा मस्तमौला कुंदन जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा काय होतं त्याची कथा आहे रांझणा…यापेक्षा कथेबद्दल आणखी काही सांगता येणार नाही.

कारण, ‘तनू वेड्स मनू’प्रमाणे या सिनेमातही आनंद राय यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय, आणि हे धक्के अर्थातच थिएटरमध्येच अनुभवण्यासारखे आहेत. मुख्य म्हणजे, उगाच स्टोरीमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी हे धक्के दिलेले नाहीयेत, तर प्रेक्षकांना पटतील अशाच प्रकारे त्यांचा वापर झालाय. कथेची मांडणी करताना लेखक-दिग्दर्शकांना समाजातील प्रश्नांची जाण आहे हेही लक्षात येतं. रांझणामध्ये केवळ हिरो-हिरोईनचं प्रेम नाही तर दिल्लीमधील युवावर्गाच्या मनातली खदखदही दिसते.

 

निर्भया प्रकरणानंतर रस्त्यावर उतरलेला युवावर्ग, त्यांच्या भावना चांगल्या टिपण्यात आल्यात. याचबरोबरीने महाविद्यालयीन राजकारण, विद्यार्थी चळवळीत फुलणारं प्रेम, बनारससारख्या धार्मिक शहरातली अंधश्रध्दा, हिंदू-मुस्लिम संबंध, पोलिसांची हतबलता आणि 90 च्या दशकातील बॉलीवूड अशा अनेक गोष्टी वास्तववादी पध्दतीने दाखवण्यात आल्या आहेत. जिथे शक्य आहे तिथं सध्याच्या व्यवस्थेविरोधात स्पष्ट शब्दात भाष्यही करण्यात आलंय, आणि म्हणूनच ही साधीसुधी प्रेमकथा ठरत नाही.

ऍक्टिंग ‘रिऍक्टिंग’

आधी म्हटल्याप्रमाणे धनुष या सिनेमाचा प्राण आहे. खरंतर, त्याचं दिसणं, त्याची शरीरयष्टी हिरोला शोभेल अशी मुळीच नाहीये. असं असतानाही दक्षिणेत दहा दहा लोकांना लोळवणार्‍या हिरोचाही रोल त्याने हिट करुन दाखवला आणि हळुवार प्रेमाची ‘कोलावेरी’ गोष्ट जगभरात नेली. याच ऍटीट्यूडने तो बॉलीवूडमध्ये आलाय. दिसणं महत्त्वाचं नाही तर अभिनय महत्त्वाचा…उच्च दर्जाचा अभिनय असेल तर नवाझुद्दीनसारखा अभिनेता मराठी कॅरेक्टर साकारताना मराठीच वाटायला लागतो अगदी तसाच धनुषसुद्धा हिरो वाटायला लागतो आणि हे कन्व्हीन्स करणं धनुषला पूर्णपणे जमलेलं आहे.

 

धनुषच्या रुपाने बॉलीवूडमध्ये नवी लाट येईल की काय असंही सिनेमा बघून वाटून जातं. धनुषच्या बरोबरीनेच अभय देओलनेही छोट्या रोलमध्ये नैसर्गिक अभिनय साकारलाय. धनुषवर एकतर्फी प्रेम करणारी बिंदीया म्हणजेच स्वरा भास्कर आणि धनुषचा मित्र मोहम्मद झीशान सुद्धा मस्तच वावरतात. प्रॉब्लेम झालाय तो सोनमचा…एवढे आसपास एकापेक्षा एक अभिनेते असताना तिने आपलं चांगली ऍक्टिंग न करण्याचं व्रत कायम ठेवलंय.

 

महत्त्वाच्या सीन्समध्ये तिच्या चेहर्‍यावर हावभाव उमटत नसल्यामुळे काही ठिकाणी परिणाम कमी होतो, पण मग तेव्हा धनुष आणि अभय तिला सांभाळून घेतात. 100 टक्के लॉजिकल सिनेमा बनवण्याचा प्रयत्न असला तरी काही ठिकाणी कथा फिल्मी वळणं घेते, पण हे खटकणं सिनेमा संपल्यानंतर
लक्षात येतं, कारण खुशखुशीत आणि चटपटीत संवाद, वेगवान कथा यामुळे शेवटपर्यंत आपण सिनेमात गुंतून राहिलेले असतो.

का पाहवा ?

खरंतर बर्‍याच काळानंतर अतिशय स्वच्छ, निर्मळ असा सिनेमा आलेला आहे. यात सेक्स नाही, हिंसा नाही, उगाच डबल मिनिंग डायलॉग्ज नाहीत, आयटम साँग्ज नाहीत, उलट जीवन जगण्याची एक वेगळी फिलॉसॉफी सांगणार्‍या रांझणाची मनापासून सांगितलेली गोष्ट आहे. ए.आर.रहमानने सुध्दा ‘रॉकस्टार’नंतर जादुई संगीत सादर केलंय. कधी या गाण्यांमध्ये ‘युवा’ मधल्या तर कधी ‘लगान’मधल्या गाण्याची आठवण होते पण ती गाणी ऐकताना आणि बघताना मन प्रसन्न करणारा अनुभव नक्कीच मिळतो. सिनेमाबद्दल सांगण्यासारख्या अशा खूप गोष्टी आहेत, त्या सगळ्याच उलगडून दाखवण्यापेक्षा थेट सिनेमा बघा आणि मस्त होऊन जा एवढंच सांगेन.

‘रांझणा’ला रेटिंग – 75

close