प्रेम आंधळं नसतं -प्रेमाचं नवं सूत्र

June 22, 2013 6:51 PM0 commentsViews: 1474

अमोल परचुरे, समीक्षक

‘प्रेमसूत्र’… पल्लवी सुभाष, संदीप कुलकर्णी, लोकेश गुप्ते आणि श्रुती मराठे ही आहे सिनेमाची स्टारकास्ट…सध्याच्या युवापिढीत प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल, शरीरसंबंधांबद्दल मोकळेपणानं बोललं जातं पण आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष नात्यांमध्ये तेवढा मोकळेपणा दिसत नाही. शरीरसंबंधांपुरतं नातं मर्यादित ठेवणं शक्य आहे का, करिअर करताना प्रेमात अडकायचं का? खरं प्रेम कसं कळणार, या स्पर्धेच्या युगात नि:स्वार्थी प्रेम खरंच शक्य आहे का ? अशा अनेक प्रश्नांची चर्चा होत असते पण प्रत्येकवेळी त्यातून समाधानकारक उत्तर मिळतंच असं नाही आणि मग आयुष्याचा गुंता होऊन जातो अशी सध्याची परिस्थिती…

premsutra marathi movie

याच विषयावर म्हणजे अगदी याच आजच्या तरुण-तरुणींच्या विश्वावर हा ‘प्रेमसूत्र’ सिनेमा बनलेला आहे. योगायोग म्हणजे एकीकडे हा सिनेमा रिलीज होतोय आणि त्याचवेळी मद्रास हायकोर्टाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालावर चर्चा सुरु आहे. सज्ञान स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी शरीरसंबंध ठेवला तर त्यांना पती-पत्नीचा दर्जा देता येईल अशा अर्थाचा हा निकाल आहे. या निकालावर बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे आणि एकप्रकारे याच चर्चेला पूरक ठरावा असा ‘प्रेमसूत्र’ हा सिनेमा आहे.
काय आहे स्टोरी ?

आनंद हा कॉर्पोरेट जगात मुरलेला आणि सध्या कामानिमित्त गोव्यात असलेला पस्तिशीचा तरुण…करिअरला त्याने नेहमीच महत्त्व दिलं त्यामुळे प्रेम, लग्न या व्यापात तो अडकला नाही, पण गोव्यात त्याला भेटते सानिया…सानिया कॅथलिक घरातली आहे, मुक्त वातावरणात वाढलेली आहे, स्वतंत्र विचारांची आहे, त्यामुळे सज्ञान स्त्री-पुरुषांनी संमतीने सुरक्षित शरीरसंबंध ठेवण्यात तिला गैर वाटत नाही, पण कुठेतरी ती खर्‍या प्रेमाच्या शोधातही आहे. आनंद तिच्या याच स्वभावावर भाळलाय. आनंदच्या अतिश्रीमंत बॉसची मुलगी मालविका हिचं आनंदवर एकतर्फी प्रेम आहे.

मालविकाचं प्रेम हे आक्रमक आहे, आनंदला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तिची तयारी आहे, आनंदचा मित्र आणि सहकारी सुजितचं प्रेम मालविकाच्या श्रीमंतीवर आहे आणि आनंदला मालविका आवडत नाही हे त्याला पुरेपूर ठाऊक आहे. असा हा एकप्रकारे प्रेमाचा चौकोन आहे. आणि याशिवाय मध्यमवर्गीय संस्कारातले आनंदचे आईवडील, पटत नसतानाही मालविकाचे हट्ट पुरवणारा गर्भश्रीमंत बाप, मानवी स्वभाव पुरेपूर ओळखून असलेली सानियाची कॅथलिक आजी अशी गेल्या पिढीतली मंडळीसुध्दा आहेत. हा दोन पिढ्यांमधला संघर्ष नाही, उलट दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद इथे दिसतो. इथे संघर्ष आहे विचारांचा…स्पर्धेचं युग असलं तरी या स्पर्धेत पहिला नंबर मिळवण्यासाठी धडपड करण्यापेक्षा नाती टिकवून मन:शांती मिळवणंही तेवढंच कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न सिनेमात झाला.

एकंदरीत अभिनय आणि दिग्दर्शक

‘अजिंक्य’ नंतर दिग्दर्शक तेजस देऊसकर आणि संदीप कुलकर्णी यांचा हा दुसरा सिनेमा…संदीपला सुचलेल्या कथेवर प्रसाद मिरासदार यांनी पटकथा लिहीलेली आहे. सिनेमाला सुरुवात झाल्यानंतर वेगवान घडामोडी घडतात, इंटरव्हलपर्यंत हा वेग कायम राहतो पण इंटरव्हलनंतर काही फिल्मी गोष्टींमुळे म्हणा किंवा गाण्यांमुळे म्हणा, सिनेमाचा वेग बराच कमी होतो. पुढे काय घडणार याचा सहज अंदाज बांधता येतो. क्लायमॅक्सला ‘ब्रेक अप पार्टी’सारख्या नव्या ट्रेंडची कथेमध्ये केलेली रचना मस्त जमून आलीये. गोव्यामध्ये झालेलं शूटिंग हा सिनेमाचा प्लसपॉईंटच म्हणायला पाहिजे.

गोव्यातले बीच असतील किंवा खाणी…लोकेशनचा सुंदर वापर सिनेमात झालेला आहे. अभिनयाबद्दल सांगायचं तर लोकेश आणि पल्लवी सुभाष यांचा अभिनय खूपच सुंदर झालाय. श्रुती मराठेनं साकारलेल्या मालविका या व्यक्तिरेखा लेखनातच थोडी कमजोर पडलीये. सिनेमा सुरु झाल्यावर ती एका शेफारलेल्या श्रीमंत मुलीच्या रुपात येते, इथं तिने लाडि कपणे बोलण्याचं मस्त बेअरिंग घेतलंय. पण हळूहळू तिचं हे बेअरिंग गायब होतं. संदीप कुलकर्णीने पस्तिशीतल्या तरुणाचा रोल साकारताना मेकअपच्या जोडीला यंग ऍटीट्यूडही आणण्याचा प्रयत्न केलाय.

सिरीयस सीन्समध्ये नाही, पण हलक्याफुलक्या प्रसंगात तो काहीसा अवघडलेला वाटतो. अशा काही गोष्टी सोडल्या तर खूप फ्रेश, अगदी आजच्या पिढीचा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही असा नक्कीच झालाय.

‘प्रेमसूत्र’ला रेटिंग – 60

close