MIDC च्या भूखंडावर ‘बाबू’गिरी

June 22, 2013 11:05 PM0 commentsViews: 136

midc nagarसाहेबराव कोकणे, अहमदनगर

21 जून : लघु उद्योगांना चालना देणं हे एमआयडीसीचं मुख्य काम. पण अहमदनगरमध्ये वेगळाच प्रकार सुरू आहे. नियम डावलणार्‍या अधिकार्‍यांना बढत्या आणि बळीचे बकरे बनलेल्या कर्मचार्‍यांचं निलंबन असा उरफाटा प्रकार तिथे घडलाय. एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी आणि दलाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट्सची नियमबाह्य खैरात करण्यात आली. त्याचा फटका बसतोय तो जागेच्या शोधात असणार्‍या लघु उद्योजकांना.
‘फोर्डचं, होंडाचं आलीशान शोरुम… तेही अनधिकृत… आणि याची कबुली देणारे खुद्द एमआयडीसीचे अधिकारीच…’नोटिसा द्यायच्या, दंड आकारायचे आणि नियमबाह्य प्लॉट नियमित करून घ्यायचे हाच इथला उद्योग. स्थानिक अधिकारी आणि काही दलालांनी मिळून एमआयडीसीच्या भूखंडांची नियमबाह्य विक्री केली. कुठे ऍमिनिटी प्लॉट विनापरवानगी बदलण्यात आले तर कुठे एक्पानशन प्लॉटमध्ये गफले करण्यात आलेत. अशा तब्बल 137 तक्रारी इथे दाखल झाल्या आहे.
विशेष म्हणजे या घोटाळ्याबद्दल कारवाई करण्यात आली फक्त दोन कर्मचार्‍यांवर. यातल्या सूत्रधार अधिकार्‍याला मात्र बढती मिळाली ती एका वजनदार नेत्याचे पीए म्हणून. यात भरडला जातोय तो स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी धडपडणारा लहान उद्योजक.
पण आशिर्वाद मिळालेल्या अधिकार्‍यांविरोधात ती कारवाई होणार का ? ज्यांना खरंच प्लॉटची गरज आहे त्यांना ते मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.

close