मनोहर जोशींचं उत्तर

June 22, 2013 11:21 PM0 commentsViews: 325

मुंबई 22 जून : उद्धव ठाकरे यांच्या ‘टाळी’ला राज ठाकरे यांनी नकार दिल्यानंतर युतीच्या अनेक नेत्यांनी वारंवार ‘टाळी’साठी हात पुढे केला. पण टाळी काही मिळाली नाही अखेर कंटाळून सेनेनं आवरतं घेतलं. पण राजकारणात कुठलाही विषय कधीच संपत नसतो असं सूचक व्यक्तव्य शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा ‘टाळी’ साठी हात पुढं केला जाईल का ? हा प्रश्न उपस्थित झालाय.

तीनच दिवसांपूर्वी शिवसेनेनं आपला 47 वा वर्धापन दिन साजरा केला. या मेळाव्यानंतर आज संध्याकाळी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. याबैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली. हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून आरपीआयनं व्यक्त केलेली नाराजी, भाजप आणि मनसेची वाढत चाललेली जवळीक या पार्श्वभूमीवर एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर बैठकीत काही चर्चा झाली का ? की, पक्षाच्या दृष्टीनं हा प्रश्न संपला असं मनोहर जोशींना विचारले असता ते म्हणाले की, याअगोदर त्यांना प्रस्ताव देण्यात आला होता पण त्यांनी स्विकारला नाही. सध्या या विषयावर आमच्याकडे कोणतीही चर्चा नाही पण राजकारणात कुठलाही विषय कधीच संपत नसतो, असं सूचक उत्तर मनोहर जोशींनी दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सेनेचं पुढे काय ? अशी चर्चा सुरू झाली होती.

ही चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून टाळीसाठी राज ठाकरेंकडे हात पुढे केला होता. यावर थेट राज यांनी टोला लगावत ‘टाळी’ला स्पष्ट नकार दिला. पण तरीही युतीच्या नेत्यांना मनसेची सोबत गरजेची वाटू लागली. युतीचे साथीदार आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनीही थेट राज यांना आवाहन केलं. ते होत नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही ‘मनसे’ साद घातली. एकीकडे युतीचे साथीदार राज यांना आवाहन देत होते तेच सेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट राज ठाकरेंनी युतीत यावं असं आवाहन दिलं. खुद्द  पक्षप्रमुखांच्या आदेशांना डावलून युतीचे नेते आवाहन करायला डगमगले नाही. मध्यंतरी उद्धव यांनी युतीच्या नेत्यांचा सामना मधून खरपूस समाचार घेतला. पण आता पक्षाचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सूचक विधान करून ‘टाळी’चा विषय संपला नाही असं स्पष्ट केलंय.

close