श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला,8 जवान शहीद

June 24, 2013 6:39 PM0 commentsViews: 488

shrinagar attak24 जून :श्रीनगरमध्ये बेमिना इथं आज भरदिवसा दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात 8 जवान शहीद झालेत. तर 11 जण जखमी झालेत. त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. बेमिनात श्रीनगर एअरपोर्टकडे जाणार्‍या रोडवर ही घटना घडली.

दहशतवाद्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लष्कराच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ला करून दहशतवादी पळून गेल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकार्‍यांनी दिलीय. या हल्ल्यानंतर बेमिना परिसर मोकळा करण्यात आलाय. आणि लष्करानं शोधमोहीम सुरू केलीय.

हिजबुल मुजाहिद्दीननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. हिजबुल मुजाहिद्दीननं एका स्थानिक न्यूज एजन्सीला फोन करून आणखी हल्ले करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. हल्ल्यासाठी स्कॉड तयार केल्याचंही हिजबुल मुजाहिद्दीननं सांगितलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या श्रीनगरच्या भेटीवर जात आहे. त्याच्या एक दिवस आधी झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. पण, सोनिया गांधी आणि पंतप्रधानांचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलंय.

close