विदर्भात पावसाचे धुमशान, 87 गावांना पुराचा धोका

June 26, 2013 3:07 PM0 commentsViews: 1764

vidharbha rain26 जून : संपूर्ण विदर्भात जोरदार पावासाने हजेरी लावलीय. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला. तर एक मुलगी बेपत्ता झालीय. भंडार्‍यातल्या गोसीखुर्द धरणातले 33 दरवाजे उघडण्यात आले असून वैनगंगा, वाघ, गाढवी, बहेला, पांगोली नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या 87 गावांना पुराचा धोका असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर गोंदियात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा सामान्यांना मोठा फटका बसला आहे. वर्ध्यातही 2 दिवसांपासून मोठा पाऊस झाला. येत्या चोवीस तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिलीय.

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले असून यातील 18 दरवाजे दीड मीटरने तर 15 दरवाजे 1 मीटरने उघडले आहे. गोसीखुर्दचे दरवाजे उघडल्यामुळे लाखांदूर तालुक्यातल्या ओपरा गावाला पाण्याचा वेढा पडलाय. साकोला-लाखांदू या तालुक्याचा मार्ग बंद झाला. जिल्हाधिकार्‍यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 490 मिमी पावसाची नोंद झालीय. जिल्हयातील वैनगंगा, वाघ, गाढवी, बहेला आणि पांगोली नदीला पूर आलाय. या पुरामुळे या नदीकाठच्या एकूण 87 गावांना पुराचा धोका निर्माण झालाय.

नागपुरात मुसळधार पावसामुळे 2 चिमुरड्यांचा मृत्यू

नागपूरमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेल्यानं दोन मुलांचा मृत्यू झालाय. तर एक मुलगी बेपत्ता झालीय. नागपूरमध्ये हर्षल मेश्राम हा विद्यार्थी वाहून गेला. तर भिवापूरमध्ये लहान भाऊ-बहीण वाहून गेले. त्यातल्या भावाचा मृत्यू झाला, तर बहीण बेपत्ता आहे. नागपूरमध्ये 15 तासांत 160.6 मिमी पाऊस झाला.

नागपूरमध्ये जून महिन्याची पावसाची सरासरी 165.9 मिमी असते. इतका जोरदार पाऊस झाल्यामुळे नागपूरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र, आता पाऊस थांबल्यामुळं पाणी ओसरलंय. तर शहरातल्या वर्धमान नगरात सेंट झेवियर्स शाळेत 100 विद्यार्थी अडकून पडले होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. शहरात सखल भागात पाणी साचलं होतं. वर्धमाननगर परिसरातल्या घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी साचलं होतं. मध्य नागपुरात काही ठिकाणी वीजही गायब झाली होती. तर मानेवाडा-बेसा परिसरात पाणी साचलं. नाग नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली होती. नंदनवन,वर्धमान नगर, नरेंद्र नगर,बेसा,पारडी या भागात पावसाचे पाणी शिरलं होते. केडीके पॅलेस समोरच्या 50 घरांमध्ये पाणी शिरलं. उंब्रेड रोडवर पाणी साचलं होतं.

विदर्भात पावसाची सरासरी

नागपूर – 160.06 मिमी
अकोला – 23.7 मिमी
अमरावती – 11.4 मिमी
चंद्रपूर – 67.0 मिमी
गोंदिया – 69.8 मिमी
वाशिम – 26.2 मिमी
वर्धा – 36.4 मिमी
यवतमाळ – 56.6 मिमी

close