जय जवान, तुम्हाला सलाम !

June 26, 2013 8:06 PM1 commentViews: 702

अनुभा भोसले,उत्तराखंड

26 जून :उत्तराखंडमध्ये हवामान खराब असल्यानं लष्कर आणि हवाई दलाला अतिशय खडतर परिस्थितीत बचावकार्य करावं लागतंय. हवाई दल आणि जमिनीवर लष्कर कसं काम करत आहेत याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट…

हर्सिलपासून सर्वात जवळ असलेलं हवाई तळ… इथूनच हवाई दलाची हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी उड्डाण करतात. तर दुसरीकडे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जवान पुरात वाहून गेलेले रस्ते पुन्हा उभारण्याच्या कामी लागलेत. हे तात्पुरते रस्ते तयार झाले तर आसपासच्या गावात अडकलेल्यांची सुटका होईल आणि हवाई दलावरचा ताण कमी होईल.

वेगवेगळ्या भागात विशेषत: गंगोत्रीमध्ये अडकलेल्यांना या लष्करी छावणीमध्ये आणण्यात आलंय. जवळपास 6 हजार लोक इथं आहेत आणि गढवाल रायफल्सचे जवान या लोकांची सर्व काळजी घेत आहेत. या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, त्यांना औषधं देणं, हे सर्व काम हे जवान बघतात. यातल्या काही जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढलं जाईल. पण, इथून 28 किलोमीटर पायी चालत गेल्यावर तिथून आपल्या गावी जाण्यासाठी गाड्यांची सोय होऊ शकते. त्यामुळे इथे असलेल्या काही जणांना पायी चालण्यासाठी तयार करणं, त्यांना धीर देणं जेणेकरून हवाई दलावरचा ताण कमी होईल यासाठीही लष्कराचे हे जवान प्रयत्न करत आहेत.

बीआरओच्या जवानांचं हे काम खूप मोलाचं आहे. कारण हे तात्पुरते रस्तेच लोकांची मृत्यूच्या जोखडातून सुटका करू शकतात.

या भागात जीवितहानी कमी झाली असली तरी पायाभूत सोयी पूर्णपणे कोलमडल्या आहेत. ठिकठिकाणी झाडं कोलमडली आहे. या रस्ता पायी पार करणं अनेकांना शक्य नाही. ते पूर्णपणे हवाई दलावर अवलंबून आहेत.

हर्सिलमध्ये अडकलेले 6 हजार लोक सुखरूप आहेत. पण, त्यांना इथून बाहेर काढणं, हे जवानांसाठी एक आव्हानच आहे. 6 हजार लोकांची सोय करायची, ते ही इतक्या खडतर परिस्थितीत आणि मदतीला आहे फक्त 100-200 जवान.. आणि म्हणूनच भारतीय सैन्याच्या या जवानांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

  • राज

    आपल्या जवानांचे उपकार,ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही.सरकार ने जवानांचा सन्मान करावा.परंतु जवानांचा सन्मान भ्रष्ट नेत्यांच्या हातून नको व्हायला.जय जवान

close