बेळगाव प्रश्नी एन.डी. पाटील यांना अटक

January 16, 2009 9:07 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी, बेळगावबेळगावमध्ये कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते एन.डी.पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बेळगावमध्ये, महामेळावा घेण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कर्नाटक सरकार सर्व प्रयत्न करत आहे. या महामेळाव्याला अगोदरचं परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. कर्नाटकच्या या दडपशाहीला एकीकरण समितीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने उत्तर देत आहेत. गटागटाने येण्याऐवजी कार्यकर्ते एक-एक करून सभास्थळी एकत्र येत आहेत. पोलिसांनी मात्र कसून चौकशी चालवली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही कारणाशिवाय अटकेत टाकण्यात येत आहे.दरम्यान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी या प्रश्नी एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला आहे. "या प्रश्नी कर्नाटक भाजपची भूमिका काहीही असली तरी आम्ही ठामपणे एकीकरण समितीच्या पाठीशी उभे आहोत. प्रसंगी मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन" अशं नितीन गडकरी म्हणाले. बेळगावात आजपासून कर्नाटकच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा घ्यायला कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीला परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारनं बुधवारी एकीकरण समितीच्या पाच नेत्यांना अटक केली. एकीकरण समिताचा महामेळावा आणि 17 जानेवारीच्या हुतात्मा दिनाचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळावा होऊ नये यासाठी कर्नाटक सरकारनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे. बेळगावला अक्षरश: छावणीचं स्वरूप आलं आहे. मात्र कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला भीक घालणार नसल्याचं एकीकरण समितीचे नेते एन. डी. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. "कर्नाटक सरकारकडे शस्त्र असेल. पण आमच्याकडेही महात्मा गांधींच्या विचारांच शस्त्र आहे. सत्य आणि न्याय आमच्या बाजूला आहे. ही सरळ सरळ लोकशाहीची पायामल्ली आहे. राज्यघटनेनं आम्हाला विचारस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र कर्नाटक सरकारची दडपशाही आणि त्यावर कोणतीही कारवाई न करणारं केंद्र सरकार यांच्याविरुद्ध कोर्टात आम्ही दाद मागणार आहोत" असं एन. डी. पाटील यांनी स्पष्ट केलं.

close