निष्पापांना मारणं इस्लामला अमान्य – जमातची 26 / 11 बद्दल भूमिका

January 16, 2009 6:10 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी, लाहोरसूर्या गंगाधरन जमात-उद-दावा या संघटनेचा समूळ नाश करण्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. पण, लष्कर-ए-तोयबाशी आपला काहीच संबंध नसल्याचं जमातचं म्हणणं आहे.'सीएनएन-आयबीएन'चे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संपादक सूर्या गंगाधरन यांनी जमातचा प्रवक्ता अब्दुल्लाह मुंतझ्झर याच्याशी लाहोरमध्ये बातचीत केली. त्यावेळी तो तसं म्हणाला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं जमात-उद-दावावर काही घातलेल्या निर्बंंधाच्या विरोधात जमात-उद-दावा अपील करणार आहे. जमातवर घातलेल्या बंदीच्या वैधतेवर या प्रवक्त्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलाये. " हे न्यायपद्धतीच्या विरुद्ध आहे. आमची बाजू न ऐकताच हा एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याशी युएननं कोणताही संपर्क साधलेला नाहीये. हा निर्णय पूर्वग्रहदुषित आहे. इनशाअल्ला आम्ही त्या लिस्टमधून जमातचं नाव काढलं जावं म्हणून प्रयत्न करू, " असं अब्दुल्लाह मुंतझ्झर म्हणाला. अनेक जिहादी संघटनांनी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. त्याबाबत जमातची भूमिका स्पष्ट करताना मुंतझ्झर सांगतो, " निष्पाप नागरिकांचे प्राण घेणं, सार्वजनिक जागेवर हल्ला करणं हे इस्लामच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. हीच आमची भूमिका आहे." अब्दुल्लाह मुंतझ्झरच्या म्हणण्यानुसार जमात आणि लष्कर यामध्ये कोणतेही संबंध नाहीत. पण हाफीज सईद यांच्याकडे दोन्ही संघटना आहेत… त्यावर मुंतझ्झर सांगतो, " लष्कर आणि जमात या दोन वेगळ्या संघटना आहेत. लष्कर स्वायत्तपणे त्यांचे निर्णय घेतं. मौलाना अब्दुल वाहिद काश्मिरी पुँछमधून किंवा पाकव्याप्त काश्मीरमधून लष्करचं नेतृत्व करतायत. हाफीज सईद यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी कधीही शस्त्र वापरलेलं नाही. इस्लामवर प्रवचनं देणं, लोकांसाठी शैक्षणिक कामं करणं हे जमातचं काम आहे."या मुलाखतीत भारत जमातचा प्रमुख हाफीज सईद याची अतिरेकी अशी प्रतिमा रंगवत असल्याचा आरोप मुंतझ्झर यानं केला. मुरीदके हे लष्करचं मुख्यालय नाही. आणि त्याचा जमातशीही संबंध नाही, असा दावा त्यानं केला. पाकिस्तान सरकारनं जमातला मुरीदकेतल्या मोफत शाळा बंद करायला भाग पाडल्याचं त्यानं म्हटलं आहे.

close