‘शासक नव्हे,आम्ही सेवक’

June 27, 2013 9:55 PM0 commentsViews: 992
27 जून : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी जम्मूनंतर मुंबईत लोकसभा प्रचाराचा दुसरा टप्पाच सुरू केला. सकाळी एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आणि पक्षाची काय तयारी असायला हवी याबाबत नेत्यांना काही सूचना केल्या. त्यानंतर मोदी थेट भाजपचा सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले. गेल्या काही दिवसात शिवसेनेचं मुख्यपत्र सामनातून मोदींवर थेट टीका झाल्यानंतर मोदी उद्धव ठाकरेंची भेट घेणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र मोदींनी वैयक्तिक रागलोभापेक्षा राजकीय गणिताला प्राधान्य दिलं आणि उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. एनडीएचे मित्रपक्ष एकीकडे साथ सोडत असताना मोदींची ही भेट महत्त्वाची मानली गेली. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये मोदी उद्योजकांना भेटले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मोदी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इथं आले. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मोदींचा भर पूर्णत: सरकार आणि लोकसहभाग यावर होता. मात्र त्याचवेळी केंद्र सरकार, गांधी घराणं आणि नितीश कुमार यांच्या धर्मनिरपेक्षतेवर अप्रत्यक्ष टीका केली. आपल्या सव्वा तास चाललेल्या भाषणाचा उपयोग मोदींनी राजकीय दृष्ट्या करत राज्यातील लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
close