असा झाला सालेमवर हल्ला

June 28, 2013 9:20 PM0 commentsViews: 1118

सुधाकर काश्यप, मुंबई

28 जून : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी आणि गँगस्टर अबू सालेमवर तळोजा जेलमध्ये एका कैद्यानं गोळ्या झाडल्या… या हल्ल्यात सालेम किरकोळ जखमी झाला असला तरी या घटनेमुळे अंडरवर्ल्डमधला वाद पुन्हा उफाळून आलाय. विशेष म्हणजे तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

स्थळ – तळोजा जेल, वेळ रात्री 7 वाजून 45 मिनिटं… नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री तळोजा जेलमधे कैदी मोजण्याचं काम पोलिसांकडून सुरु होतं..आणि अचानक फायरिंगच्या आवाजनं तुरुंगात एकच खळबळ उडाली. कुख्यात गुंड अबू सालेमवर एका कैद्यानं गोळीबार केला. देवेंद्र जगताप या कैद्यानं आपल्या जवळच्या रिव्हॉल्वरमधून सालेमवर 2 गोळ्या झाडल्या… यातली एक गोळी सालेमच्या हाताला लागली.. सालेमला तात्काळ नवी मुंबईतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. या घटनेनंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

सालेमवर तुरुंगात हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 2010 मध्ये मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात सालेमवर हल्ला झाला होता. गँगस्टर मुस्तफा डोसा आणि त्याच्या सहकार्‍यांनी चमच्यानं सालेमवर हल्ला केला होता. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सालेमला तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं. पण तळोजा तुरुंगात तर त्याच्यावर रिल्व्हॉलवरनंच हल्ला झाला. या घटनेला जबाबदार धरत एक पोलीस अधिकारी आणि तीन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आलंय.

पण सालेमवरच्या हल्ल्यामुळे तुरुंगातली ढिसाळ सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आलीय. आरोपी देवेंद्र जगतापकडे रिव्हॉल्व्हर आलं कुठुन, अबु सालेम, अरुण गवळी, डी के राव असे नामचिन गुंड जेलमध्ये असतानाही सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी राहिली कशी, कैद्यांची तपासणी करतेवेळी सुरक्षा रक्षकांना जगतापकडे रिव्हॉल्वर असल्याचा थांगपत्ता कसा लागला नाही, यात तुरुंगातल्याच कोणाचे हितसंबंध आहेत का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा हल्ला कोणी आणि का केला, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

close