हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहिदांना श्रद्धांजली

June 28, 2013 10:48 PM1 commentViews: 281

28 जून : उत्तराखंडमधील मदतकार्य आता अंतिम टप्प्यात आलंय. पूरग्रस्त भागात अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरुच राहणार असल्याचं लष्करप्रमुखांनी सांगितलंय. आतापर्यंत लष्कर, निमलष्करी दलं, आणि इतर संस्थांच्या प्रयत्नांमधून एक लाखाहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलंय. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या 20 जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

उत्तराखंडमध्ये बचावकार्य करताना वीर मरण आलेल्या भारताच्या जवानांना आज देहराडून आणि हवाई दलाच्या हिंडनइथल्या तळावर श्रद्धांजली वाहण्यात आली. मंगळवारी झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातात हवाई दलाचे 5, एनडीआरएफचे 9 आणि आयटीबीपीचे 6 जवान शहीद झाले होते.

एकीकडे श्रद्धांजली वाहण्यात येत असताना हर्सिल आणि धरसू भागात बचावकार्य करणार्‍या पवनहंस हेलिकॉप्टरला छोटा अपघात झाला. पण, सुदैवानं यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

शुक्रवारीही बचावकार्य जोरात सुरू होतं. पण, अजूनही पंचवीसशे लोक अडकलेत. पर्यटकांप्रमाणेच उत्तराखंडमधल्या स्थानिकांनाही या प्रलयाचा जबर तडाखा बसलाय. अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. त्यांच्या अन्न-वस्त्र-निवार्‍याची, औषधांची व्यवस्था उत्तराखंड सरकारला करायचीय. एकूणच पीडित स्थानिकांच्या पुनर्वसनाचं मोठं आव्हान उत्तराखंड सरकारसमोर असेल.

  • Rahul Mahire

    भारतीय सरकारला एकाच विनंती शहीद जवानांचा परिवाराला उघड्यावर टाकू नका, वेळ जातो जातो, लोक विसरतात , काळ बदलतो, सरकार बदलते. परंतु नंतर शहीद जवानांचा परिवाराला कोणी च विचारात नाही .

close