प्रमिलाचे मारेकरी कोण?

June 29, 2013 9:21 PM3 commentsViews: 1440

   dipti_raut_ibn_lokmat_nashik                                                                         Posted by- दीप्ती राऊत ब्युरो चीफ, IBN लोकमत,नाशिक

‘गरोदर मुलीची बापाने केली हत्या’..… नाशिकमधली ही घटना. माणूस म्हणून हादरवून टाकणारी, पोटात कालवाकालव करणारी आणि तेवढीच विचार करायलाही लावणारी. मुलगी जीवानिशी गेली, जन्मदात्या बापाच्या हातून मेली. तिच्या पोटातला अंकुर जन्मघेण्याआधीच संपला. पोलिसांनी बापाला अटक केली, त्याच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, पुढे ही केस कोर्टात चालेल, तथावकाश बापाला शिक्षा होईल, कदाचित जन्मठेपेची कदाचित त्यातील क्रौर्य लक्षात घेऊन अधिक गंभीरही. दिवस सरतील आणि लोक विसरूनही जातील.  पण विषय इथेच संपणार नाही. नाशिकमधील ही घटना समाज म्हणून आपल्या सर्वांपुढे काही गंभीर प्रश्न उपस्थित करून गेली आहे.

पहिला प्रश्न आहे तो या घटनेतील क्रौर्याचा. जातिभेदाच्या आपल्या समाजात आजही जातीचे कांगोरे किती तीव्र आहेत हे तपासण्याचं परिमाण म्हणजे आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात येणारे अनुभव, व्यक्त होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया. अनेक आंतरजातीय विवाहांना आजही जातीच्या कारणावरून विरोध होताना दिसतो. मात्र सामान्यपणे त्या मुलीचे गरोदरपण किंवा बाळंतपण हे विरोध करणार्‍या नाराज पालकांना पाझर फुटण्याचं निमित्त ठरतं. मात्र नाशिकमधील या चाकोरीला अपवाद ठरली आहे. पोटची मुलगी पोटुशी असताना, तिचा जीव घेणाऱ्या बापानं अमानुषतेचा कळस गाठला आहे. इतकंच नाही तर त्यासाठी पहाटे रिक्षावाल्यांना बोलावणं, सोबत गळा आवळण्यासाठी दोरी घेणं, आजी आजारी असल्याचा बनाव करणं, रिक्षावाल्याला खोटं सांगून बाहेर काढणं आणि त्या दोरीनं मुलीचा गळा आवळून तडफडून तिला ठार करणं हे सारं कोणत्याही माणूसपणाच्या पातळीवर न बसणारं. समाज म्हणून निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण या मानसिकतेचा काय विचार करणार?

दुसरा प्रश्न आहे तो सामाजिकतेचा. आतापर्यंत जातीच्या प्रतिष्ठेचा फाजील मुद्दा उच्च जातींमध्ये भिनलेला दिसत होता. हरियाणातील जाट समाज असो, राजस्थानातील रजपूत वा महाराष्ट्रातील मराठा. पण प्रमिलाची केस याबाबतही वेगळी आहे. प्रमिलाचे वडील भटक्या विमुक्त समाजातील आहेत हा या घटनेतील महत्त्वाचा सामाजिक संदर्भ आहे. जातीच्या बेगडी प्रतिष्ठेचा डंक आता भटक्या विमुक्त समाजासारख्या वंचित उपेक्षित घटकापर्यंत पोहोचला असेल तर या सामाजिक अवनतीला जबाबदार कोण? उद्या आदिवासी समाजातून हुंडाबळीची घटना घडली तर याचं समाजशास्त्रीय विश्लेषण आपण कसं करणार? सामाजिक विघातक रूढी समूळ नष्ट करणं दूर, त्याचा वाढता संसर्ग कसा रोखणार?

तिसरा प्रश्न आहे तो समाजाच्या मानसिकतेचा. प्रमिलाच्या लग्नाला एक वर्ष उलटून गेले होते. मग वर्षभरानंतरही त्यांच्या मनातील राग धगधगत कसा राहिला, तर याबद्दल सांगितलं जातंय ते नातलगांचे आणि इतरांचे टोमणे आणि बोलणी. प्रमिलाचे वडील कायम दारू पितात, काही कामधंदा करीत नाहीत आता तर मुलीच्याच जीवावर उठले हा तिच्या आईचा आक्रोश. मुलानं दुसर्‍या जातीत लग्न केलं म्हणून सतत डिवचणार्‍या नातलगांनी आणि समाजाने आतापर्यंत त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल किंवा कामचुकारपणाबद्दल किंवा सांसारिक जबाबदारी नाकारल्याबद्दल का डिवचलं नाही? आता एवढे अमानुष कृत्य केल्याबद्दल हेच नातलग आणि हाच समाज त्यांना वाळीत टाकणार की जातीच्या प्रतिष्ठेसाठी पोरीला जीवानिशी संपवली म्हणून गौरव करणार?

सहा महिन्यांपूर्वी जातीच्या प्रतिष्ठेपायी तीन तरुणांच्या निर्घृण हत्या करण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावात झाला होता. त्यावेळीही आरोपींना अटक केल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर अपराधीपणा किंवा पश्चात्तापाचा लवलेश नव्हता. उलट आम्ही जामिनावर सहज बाहेर येऊ नाहीतर जन्मठेप भोगूनही परत येऊ, काही फरक पडणार नाही, आम्ही केलं ते योग्यच केलं असेच भाव होते. प्रमिलाच्या वडिलांची प्रतिक्रियाही अटकेनंतर वेगळी नव्हती. बाप म्हणून कर्तव्याची जबाबदारी झटकायची आणि जातीच्या नावावर पुरुष म्हणून हे अघोरी शौर्य मिरवायचं ही विकृती येते कुठून? आणि हे सारं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?

या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं की त्याची उत्तरं शोधण्याची हा शेवटी समाजाचा प्रश्न. अवघ्या 20 वर्षांची प्रमिला. खरं तर दुसऱ्याच दिवशी ती बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होणारी होती, पण त्या आधीच तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागात दाखल झाला. वडील माहेरी न्यायला आले म्हणून आनंदात नवीन साडी नेसलेली प्रमिला. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि अटकेनंतरही वडिलांच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव. ना अपराधीपणांचा लवलेश ना पश्चात्तापाची खंत. उलट हो मी तिला मारली आणि मेली नसेल तर अजून मारेन हा मुजोरपणा. याला जबाबदार कोण? याचं करायचं काय?

 • Mahatisagar

  Aapala samaj kharach far kodaga zala aahe.

  Eke kali jati bhed java mhanun kii mahapurushani ladha dila, te mahapurush gele pan he jaat kay jat nahi.

  Hya jatine maharashtratil kiti tari lokancha, hushar & hotkaru, vidyarthyancha, premi yugalancha, vivahit jodapyancha aayushyachi rakh rangoli keli aahe…

  He Jaat kay jat nahi…. Farach vait…..

 • Rahul Mahire

  खरतर लहानपणा पासून च शाळेत मुलांना सर्व धर्म साहिश्नुताचे धडे दिले गेले पाहिजेत, प्राथमिक शाळेपासूनच मुलांना माणूस म्हणून घडवायला पाहिजे, परंतु आता तस होतांना दिसत नाही.

 • ashish chandanshive

  mi paper madhye khup vela wachlay matrimonials site madhye tyanna mulgi or mulga kasahi asla tari chalel pan SC,ST khsamasva…He asa kiti diwas chalu rahnar??jaat ha mudda khup bhayankar aahe…hyasathi Rajkarnyani swatachya mulanche vivah parjatit laun ek navin adarsh dyava..for eg Ritesh Deshmukh and Genelia….

close