सीमाप्रश्नी राष्ट्रपतींची मदत घ्यावी – नितीन गडकरी

January 17, 2009 6:42 AM0 commentsViews: 3

17 जानेवारीबेळगाव प्रश्नी शिवसेनेनं युती तोडण्याचा निर्णय घेतलाच, तर तो दुदैर्वी असेल. असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यापेक्षा या प्रश्नावर तोडगा काढणं जास्त गरजेचं आहे, असंही ते म्हणेले. भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. मात्र याचवेळी हा कर्नाटक किंवा महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्षेत्रातला प्रश्न नसून केंद्र सरकारच त्यावर तोडगा काढू शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "याआधी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हाही अशा घटना घडल्या. तेव्हाही आणि आत्ताही या प्रश्नी आम्ही मराठी माणसाला देत आहोत. पण यावेळी मराठी महिला राष्ट्रपतीपदी विराजमान आहेत. त्यांना निवडून देण्यात शिवसेनेनं मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळे शिवसेनेनं राष्ट्रपतींची भेट घेऊन याप्रश्नी त्यांची मदत घ्यावी. राष्ट्रपतींना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला गेल्यास आम्हीही त्यात सामील होऊ आणि मराठी माणसाची बाजू उचलून धरू." असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.यावेळी कर्नाटक सरकारचाही त्यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला. "या प्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका अयाग्य आहे. त्यांनी मराठी माणसाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल आम्ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार नोंदवली आहे. कर्नाटक भाजपची भूमिका वेगळी असेल तरी आमचा मराठी माणसाला एकमुखी पाठिंबा आहे" असं ते म्हणाले.

close