केनियाचा केनेथ मुगारा पहिला

January 18, 2009 2:03 PM0 commentsViews: 7

18 जानेवारी, मुंबईमुंबई मॅरेथॉनमध्ये कोण जिंकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. केनियन धावपटू जिंकतील असा सगळ्यांचा कयास होता. आणि हा कयास खरा ठरला. मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियन धावपटूंचा दबदबा असल्याचं पुन्हा एकवार सिद्ध झालं आहे. केनियाच्या केनेथ मुगारानं 2 तास 11 मिनिटं आणि 51 सेकंदांच्या विक्रमी वेळेत 42 किमीचं अंतर कापलं. केनेथ मुगाराच्या या विक्रमानं सहाव्या आंतराराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनच्या विजेतेपदाचा मानाचा तुरा केनियाच्या शिरोपेचात खोवला गेला. केनियाचाच डेविड टॉरस या मुंबई मॅरेथॉनमध्ये दुसरा आला, तर हॅटट्रिकचं स्वप्न उराशी बाळगणा-या केनियाच्याच जॉन केलायला तिस-या स्थानावर समाधान मानावं लागलंय. भारतातर्फे यंदा सलग तिस-यांदा अव्वल स्थानावर रामसिंग यादव यानं क्रमांक पटकावत हॅट्ट्रिक पूर्ण केलीये. ते हाफ मॅरेथॉनचे विजयी ठरले आहेत. संतोष कुमार हाफ मॅरेथॉनमध्ये दुसरे आले आहेत. तर महिलांमध्ये कविता राऊतनं हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 2007 आणि 2008 ची मुंबई मॅरेथॉन केनियाच्या जॉन केलायनं जिंकली होती. यंदा जॉन मुंबई मॅरेथॉन जिंकून हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा होती. परंतु केनियाच्याच टोरंटो मॅरेथॉन जिंकणा-या केनेथ मुगारानं जॉनला टक्कर देत मुंबई मॅरेथॉनच्या जेतेपदावर स्वत:चं नाव कोरलं. जॉन केलाय यानं गेल्यावर्षीची मुंबई मॅरेथॉन 2 तास 12 मिनिटं आणि 22 सेकंदात जिंकली होती. मात्र केनेथ मुगारानं यंदा 2 तास 11 मिनिटं आणि 51 सेकंदात जॉन केलायच्या गेल्यावर्षीच्या विक्रमावर मात करत जिंकली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉन प्रकारात सुरेंद्र सिंगनं बाजी मारलीय तर महिलांमधे कविता राऊतनं पहिला क्रमांक पटकावलाय. सुरेंद्रसिंगनं 1 तास 06 मिनिटं आणि नऊ सेकंद या वेळेत हाफ मॅरेथॉनम पूर्ण केली. तर संतोष कुमारनं 1 तास 8 मिनिटं आणि 08 सेकंद एवढा वेळ नोंदवत दुसरा क्रमांक गाठला. 1 तास 8 मिनिटं आणि 35 सेकंद एवढा वेळ नोंदवत बी.सी.टिळकनं या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता. हाफ मॅरेथॉनच्या महिला विभागात महिला विभागात कविता राऊतनं 1 तास 20 मिनिटं आणि 58 सेकंद एवढा वेळ नोंदवत पहिली क्रमांक पटकावला..तर प्रिती एल रावनं एक तास 21 मिनिटं आणि 23 सेकंदाची वेळ देत दुसर्‍या क्रमांकावर बाजी मारली. एक तास 34 मिनिटं आणि 30 सेकंद एवढा वेळ नोंदवणार्‍या वैशाली चटारेनं तिसरा क्रमांक पटकावला. मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात केनियाच्या धावपटूंचं वर्चस्व होतं. तर महिला विभागात इथोपियाच्या धावपटूंनी बाजी मारली. इथोपियाच्या हैली केबाबुश हिनं दोन तास 34 मिनिटं आणि 5 सेकंद एवढा वेळ नोंदवत पहिली क्रमांक पटकावला. तर इथोपियाच्याच मार्थानं दोन तास 34 मिनिटं आणि बारा सेकंद एवढा वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकवला. मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला संयोजकांच्या गलथानपणामुळे अखेर गालबोट लागलंच पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय विभागातील महिला विभागाच्या निकालात हा गोंधळ झाला. भारतीय विभागातील महिला गटात इंद्रेश धीरजला विजेती घोषित करून तिला सन्मानित केलं गेलं. या निकालानुसार लिल्लाम्मा अल्फान्सो आणि इंद्रेशचीच बहीण किरण धीरज यांना अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाने गौरवण्यात आलं.पारितोषिकंही बहाल करण्यात आली. इंद्रेशनं 3 तास 14 मिनिटं आणि 13 सेकंदाची वेळ दिली होती. पण नंतर व्हिडीओ फुटेजवरून अरुणा देवीनं हीच शर्यत 3 तास 9 मिनिटं आणि 59 सेकंदात पूर्ण केली होती.पाच मिनिटांचा हा फरक लक्षात घेऊन अखेर संयोजकांनी इंद्रेशचं विजेतेपद काढून अरूणा देवीला बहाल केलंमुंबईकरांच्या अफाट जिद्दीची प्रचिती या मॅरेथॉनमध्ये आली. अपंग अंगद दहशतवादाचा निषेध करण्यासाठी मॅरेथॉनमध्ये धावला. मुंबई मॅरेथॉनमध्ये अंगद गेल्या 6 वर्षांपासून धावत आहे. मॅरेथॉनमध्ये खेळाडूंच्या वेगाला संगीताची ताल मिळाली ती चिल्ड्रन मुव्हमेंट फॉर सिव्हिक अव्हेरनेस म्हणजेच सीएमसीएच्या टीमची. सीएमसीएच्या टीमनं निरनिराळी गाणी म्हणत मॅरेथॉनमधल्या धावपटूंना चिअरअप केलं. ही मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे अनेकजण अहोरात्र राबत होते. मुंबईतील रस्ते मॅरेथॉनसाठी चकाचक करणारे सफाई कामगार हे पडद्यामागील अशाच काहीं हिरोंपैकी एक. 'स्वच्छता राखणं हे आमचं कर्तव्य आहे. मुंबई महानगरपालिका मुंबईचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी अशीच धडपडणार, ' अशी या सफाई कर्मचा-यांची भावना होती. मुंबई मॅरेथॉनमधे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. जॉन एब्राहम, शर्मिला टागोर, विद्या बालन, गुलशन ग्रोव्हर या कलाकारांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. एक नजर भारतीय धावपटूंच्या मॅरेथॉनमधल्या कामगिरीवर : -2004मध्ये के सी रामूनं दोन तास 26 मिनिटं आणि चौदा सेकंदाची वेळ नोंदवत सर्वाधिक वेगवान भारतीय धावपटूचा मान पटकावला. 2005मध्ये बालारामनं 2 दोन तास 25 मिनिटं 43 सेकंदाची वेळ नोंदवत ही स्पर्धा जिंकली. तर 2006मध्ये नथूरामनं दोन तास चोविस मिनिटं आणि 43 सेकंद एवढा वेळ नोंदवत स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली.. 2007 आणि 2008 या वर्षाच्या मुंबई मॅरेथॉन गाजवल्या त्या भारताच्या राम सिंगनं. रामसिंगनं 2007मध्ये 2 तास 20 मिनिटं आणि 33 सेकंद एवढा नोंदवला तर 2008मध्ये त्यानं यापुढे जाऊन चांगली कामगिरी केली. त्यानं दोन तास 18 मिनिटं आणि 23 सेकंद एवढा वेळ नोंदवला. भारतातर्फे नोंदवलेला ही सर्वात कमी वेळातली कामगिरी होती. एक नजर याआधीच्या पाच मॅरेथॉनमधले विजेते आणि त्यांनी विक्रम नोंदवलेल्या वेळांवर : -2004मध्ये मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. या पहिल्यावहिल्या मॅरेथॉनवर नाव कोरलं ते दक्षिण आफ्रिकेच्या हेन्ड्रीक रमालानं. त्यानं 2 तास 15 मिनिटं 47 सेकंद एवढा वेळ नोंदवत ही मॅरेथॉन जिंकलं. पण यानंतर या स्पर्धेवर केनियन धावपटूंचंच वर्चस्व राहिलं. 2005मध्ये केनियाच्या ज्युलिस सुगतनं 2 तास 13 मिनिटं आणि 20 सेकंदाची वेळ नोंदवत स्पर्धा जिंकली. तर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार सहा मध्ये रोनो डेनिअलनं 2 तास 12 मिनिटं 3 सेकंद एवढा वेळ नोंदवत मॅरेथॉनवर आपलं नाव कोरलं. 2007 आणि 2008 या दोन्ही स्पर्धा केनियाच्या जॉन केलईनंआपल्या नावावर केल्या. 2007मध्ये त्यानं 2 तास 12 मिनिटं आणि सत्तावीस सेकंद एवढा वेळ नोंदवला. तर 2008मध्ये त्याला गेल्या वर्षीपेक्षा पाच सेकंद कमी वेळ नोंदवत ही स्पर्धा जिंकली. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये तो विजयाची हॅट्‌ट्रीक करण्यासाठी सज्ज झाला होता. पण यंदा त्याला तिस-या स्थानावर समाधान मानवं लागलं.

close