कर्नाटकच्या दडपशाहीविरुद्ध आंदोलन

January 18, 2009 4:46 PM0 commentsViews: 4

18 जानेवारीबेळगावमध्ये कर्नाटक सरकार मराठी माणसांवर करत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्याच्या एका बसला पेटवून दिली आहे. बेळगावात कनार्टक राज्याचं विधीमंडळ हिवाळी अधिवेशन भरलं आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं शुक्रवारी बेळगावातल्या मराठी भाषिकांचा महामेळावा भरणार होता. तो मेळावा बेळगावमधल्या टिळकवाडीच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर लाठीमार केला होता. या लाठीमाराचे लातूर आणि लगतच्या सीमाभागांत पडसाद उमटले आहेत. लातूरमध्ये काला दुपारी 2.00 वाजता कनार्टक राज्याच्या नकाशाचं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं होतं. तर आज लातूरच्या राजीव गांधी बसडेपोत कर्नाटक राज्याची बस जाळलीये. कर्नाटक राज्याची बस जवळपास 100 टक्के जळाली आहे. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातल्या मराठी भाषिकांच्या प्रश्नांचं घोंगडं भिजत पडलं आहे. या आगीत तेल ओतण्याचं काम शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर केलेल्या लाठीमारामुळं केलं आहे. पुण्यातही या प्रकरणाचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बसस्थानकावर कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. कर्नाटक सरकारच्या गाड्यांवर भगव्या रंगाने कर्नाटक सरकारला इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आला. 'जर कर्नाटकात मराठी माणसांना त्रास दिला तर महाराष्ट्रातील कानडी माणसांना त्याची किंमत चुकवावी लागेल' असा इशारा बसवर लिहिण्यात आला.

close