राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली

July 5, 2013 7:39 PM0 commentsViews: 1763

05 जुलै : सांगली महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राज्यात आघाडीमध्ये सोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इथे मुख्य लढत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर अक्षरशः विखारी शब्दांत टीका केली. जयंत पाटलांनी माणिकरावांवर अजित दादांनी मुख्यमंत्र्यांवर तर आर आर पाटलांनी नारायण राणेंवर आणि नारायण राणेंनी संपूर्ण राष्ट्रवादीवर ‘प्रहार’ केलाय. ही महापालिकेची निवडणूक आहे की विधानसभेची.. असा प्रश्न पडावा, इतके दिग्गज नेते सांगलीत डेरेदाखल झाले आहेत.

माणिकराव लोकांमधून निवडून दाखवा -अजित पवार
माणिकराव लोकांमधून निवडून येता येत नाही तर काय गप्पा मारताय. आम्ही एक-एक लाख मतांनी निवडून आलोय. निवडणूक लढवणं येड्या गबाळ्याचं काम नाही, असा खोचक टोला अजित पवारांनी माणिकरावांना लगावला. तसंच जुन्या काळात चेंबुरमध्ये गुंडांची एक टोळी प्रसिद्ध होती एक होता हर्‍या आणि दुसरा कोण होता हे तुम्हीच शोधून काढा असं सांगत पवारांनी नारायण राणे यांचं नाव न घेता टीका केली.

राणेंची टीका म्हणजे मोठा विनोदच – आर.आर.पाटील
सगळेच जण आता टीका करताय. आमचे मित्रपक्षातले नेते नारायण राणे यांनी ही टीका केली आता त्यांनी टीका करणे म्हणजे यापेक्षा मोठा विनोद नाही. गुंडाच्या मांडीला मांडी लागली तर कापून टाकेलं असं मी म्हटलो होतो आणि आजही तेच म्हणतो. पण राणे आणि मी मंत्रिमंडळात एकमेकांच्या आजूबाजुला बसतो म्हणजे मला दर बुधवारी मांडी कापावी लागेल असा खोचक टोला आर.आर.पाटील यांनी राणेंना लगावला.

काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायला माझं काय डोकं फिरलंय?
काँग्रेस पक्षात जायला माझं काय डोकं फिरलंय. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. मी लहानपणापासून शरद पवारांना मानत आलोय. मग काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

सोनिया गांधींचं नाव घेण्याची कुवत आहे का?- राणे

सोनिया गांधी या दिल्ली असतात आणि तुम्हाला त्यांचं नाव घेण्याची कुवत तरी आहे का? आम्ही जर टीका केली ना पळताभुई होईल. मंत्रिमंडळात तुम्हा आमच्या मांडीला मांडी लावून बसतात म्हणून आम्ही सयंम राखतो असा ‘प्रहार’ नारायण राणेंनी राष्ट्रवादीवर केला.

close