महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाच नेत्यांची सुटका

January 19, 2009 7:03 AM0 commentsViews:

19 जानेवारी, बेळगावपंधरा जानेवारीला महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली होती. त्या सगळ्यांची आज सुटका करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीनं कर्नाटक सरकारच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या विरोधात महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. हा महामेळावा होऊ नये यासाठी कर्नाटकनं दंडेलशाहीचा वापर केला होता. तसंच माजी आमदार मनोहर किणीकर, तालुका एकीकरण समितीचे अध्यक्ष निंबोजी हुद्दार यांना अटकही केली होती. पण आज सकाळी त्यांच्यासह अन्य पाच नेत्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन मोडून काढण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न सुरूच आहे. 26 जानेवारीपर्यंत कर्नाटकचं विधानसभा अधिवेशन बेळगावात चालू आहे. त्यानंतर कन्नड साहित्य संमेलन बेळगावात होणार आहे. त्यादृष्टीने अजूनही बेळगावात पुरेपूर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.या दंडुकेशाहीला जुमानणार नसल्याचं महाराष्ट्र एकीकरण समितीनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समतिीच्या नगरसेवकांची लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे. या प्रश्नी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घ्यावी आणि त्यांच्यासमोर हे गार्‍हाणं मांडावं असा प्रस्ताव विचाराधीन आहे.

close