भाजप-संघ साथसाथ !

July 6, 2013 10:53 PM0 commentsViews: 507

RSS mohan bhagvat modi advani06 जुलै : आगामी पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका या सामूहिक नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय राष्ट्रीय सरसंघचालक आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या बैठकी दरम्यान झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आगामी निवडणुकांच्या रणनितीबाबत चर्चा करण्यासाठी आज पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह नागपूरमध्ये आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी याबाबत चर्चा केली. गेल्या काही दिवसात पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी सुद्धा सरसंघचालकांशी चर्चा केल्याने आगामी काळात संघाच्या विचारानेच रणनिती आखली जाणार हे स्पष्ट झालंय

भाजपमध्ये गेल्या महिन्यात निवडणूक प्रचारप्रमुखपदाच्या निवडीवरून आणि त्यानंतर झालेल्या ‘भूकंपा’नंतर आता भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलीय. दोन दिवसांपुर्वी दिल्लीत नवे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपची पहिली कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी समोरासमोर आले. या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवस लालकृष्ण अडवाणींनी नागपूर गाठले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर भाजप आगामी निवडणुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊनच लढणार असल्याचं लालकृष्ण अडवाणी स्पष्ट केलं. तसंच मोहन भागवत यांच्यासोबतची बैठकीनंतर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रियाही अडवाणींनी दिली. त्याच्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही मोहन भागवत यांची भेट घेतली तर आज अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अडवाणींची भेट घेतली. भाजपमध्ये संघाचा मात्रा या निमिताने पुन्हा एकदा लागू झाला आणि हे जग जाहीरही आहे.

एकीकडे राजनाथ सिंग भागवतांची भेट घेत होते तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी अयोध्येला भेट दिली. आणि राममंदिराच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं. भाजप लवकरच अयोध्येत भव्य राममंदिर बांधेल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या विधानामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपने राम मंदिरात राग आळवलाय. तर दुसरीकडे काँग्रेसने अन्न सुरक्षा विधेयकाचा अध्यादेशाला मंजुरी देत मुदत पूर्व निवडणुकीचे संकेत दिले. त्यामुळेच आता भाजपनेही निवडणुकांच्या तयारीसाठी रणनीती आखायला सुरूवात केली असून धावाधाव सुरू केलीय.

close