’10 स्फोट झाले’

July 8, 2013 5:31 PM0 commentsViews: 257

08 जुलै : बोधगयामध्ये महाबोधी मंदिरात एकूण 10 बॉम्बस्फोट झाले असून दहशतवाद्यांनी त्याठिकाणी 13 बॉम्ब ठेवले होते अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. सुरुवातीला प्राथमिक माहितीनुसार 9 स्फोट झाले होते असं सांगण्यात आलं होतं, पण आज तपासाअंती 10 स्फोट झाल्याचं स्पष्ट झालंय.

 

रविवारी महाबोधी मंदिर परिसरात पहाटे पाचच्या सुमारास 10 साखळी बॉम्बस्फोट झाले. यात दोन परदेशी बौद्धगुरु जखमी झालेत. हा अतिरेकी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. महाबोधी मंदिर परिसरात 4 बॉम्बस्फोट झाले. करमापा मठाजवळ 3 बॉम्बस्फोट झाले. तर एक बॉम्बस्फोट बुद्ध मूर्तीजवळ उभ्या असलेल्या एका बसखाली झाला. पण, स्फोटांमुळे मंदिराचं नुकसान झालेलं नाही. घटनास्थळावरून तीन जिवंत बॉम्ब सापडलेत. अधिक तपासासाठी नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी
दाखल झालीय.

 

स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात?

 

महाबोधी मंदिरात झालेल्या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याच्या संशयाला आणखी बळकटी आली आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज आज पोलिसांनी प्रसिद्ध केलं. या स्फोटांप्रकरणी पोलिसांनी रविवारी एकाला गयामधून ताब्यात घेतलंय. याप्रकरणी म्यानमारमधल्या संघर्षाचा काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, आज विशेष प्रार्थनेनंतर संध्याकाळी पाच वाजता बोधगया मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे. महाबोधी मंदिराबाहेर घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम आणि गंधकाचा वापर करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय.

 

हल्ल्याची माहिती असूनही झाले स्फोट

बिहारमध्ये झालेला हा पहिला अतिरेकी हल्ला असल्यानं आता बिहारही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आलंय. पण, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे असा हल्ला होणार, याची माहिती गुप्तचर विभागालाही होती.

- दिल्ली पोलिसांनी ऑक्टोबर 2012मध्ये गुप्तचर विभागाला यासंबंधीची माहिती दिली होती.
– इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा ऑपरेटिव्ह असलेल्या संशयित अतिरेक्याची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली होती.
– भटकळ बंधुंकडून गयावर अतिरेकी हल्ला करण्याचे आदेश मिळाल्याचं त्यानं सांगितलं होतं.
– म्यानमारमधल्या रोहिंग्या मुस्लिमांकडून बोधी मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर विभागानं जूनच्या शेवटच्या आठवड्यातच बिहार सरकारला दिला होता.

close