आदिवासी महिला सरपंच झाली साक्षर

January 19, 2009 9:41 AM0 commentsViews: 12

19 जानेवारी, सटाणाजयवंत खैरनार आरक्षणामुळे शेवटच्या स्तरातल्या महिलांना सत्तेतला वाटा मिळाला. पण बर्‍याचदा शिक्षणाअभावी त्या टिंगलटवाळीचा विषय ठरल्या, तर कधी सत्तेच्या राजकारणात फसवणुकीच्याही बळी ठरल्या. यातून मार्ग काढण्यासाठी सटाण्यातल्या एका आदिवासी महिला सरपंचानं नामी शक्कल लढवली आहे. त्या आदिवासी महिलेचं नाव आहे उखड्याबाई पवार. उखड्याबाई पवारांनी साक्षर होण्याचा मार्ग चोखाळला आहे. उखड्याबाई पवार. खामखेडच्या प्रथम नागरिक, अर्थात सरपंच. खामखेडचं सरपंचपद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाल्यावर उखड्याबाईंना गाव कारभार बघण्याची संधी मिळाली. पण निरक्षरपणाचा अडथळा येत होता.उखड्याबाईंनी घाबरून न जाता, नव्यानं अक्षरओळख सुरू केली. शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्यांनी हे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. पंचायतीतली काम संपलं की उखड्याबाई थेट रस्ता धरतात तो शाळेचा. शाळेत त्यांच्यासाठी खास तास भरतो. थेट मुख्याध्यापकच त्यांना लिहिण्यावाचण्याचे धडे देतात. स्वत:च्या रोजच्या दिनक्रमाविषयी सरपंच उखड्याबाई पवार सांगतात, " सरपंच झाले, पण मला सही येत नव्हती. अडचणी येत होत्या. आता सही शिकल्यामुळे मला आनंद झाला." उखड्याबाईंविषयी शाळेचे मुख्याध्यापक कैलास बिरारी सांगतात, " अनुसूचित जातीजमातींना सरपंच पद राखीव झालं आहे. ग्रामशिक्षण समिती, ग्रामपंचायतीचा कारभार, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळांचं नियोजन यात बर्‍याच अडचणी येतात. सरपंच त्यांचे अध्यक्ष असतात. त्यामुळे सरपंच साक्षर असणं आवश्यक आहे. उखड्याबाईंनीही खूप प्रगती केली आहे. "निरक्षर महिला सरपंच आतापर्यंत टिंगलटवाळीचा विषय ठरल्यात किंवा फसवणुकीच्या बळी आहेत. राजस्थानच्या राज्यमंत्री गोलमादेवीची अशिक्षितपणामुळे झालेली तारांबळ सगळ्या देशानं पाहिली पण या छोट्याशा खेडेगावात या आदिवासी महिलेनं मोठ्या जिद्दीनं निरक्षरांसाठी मोठा संदेश दिला आहे. उखड्याबाईचा हा पाठ सर्वांनी गिरवायला हवा.

close