अँडी मरेनं पटकावलं विम्बल्डन जेतेपद

July 8, 2013 7:47 PM0 commentsViews: 134

08 जुलै : ब्रिटनच्या अँडी मरेनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आणि ब्रिटनला तब्बल 77 वर्षांनंतर पहिला विम्बल्डन चॅम्पियन मिळाला. फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोव्हॅक जॉकोविकचा सरळ सेटमध्ये पराभव करत मरेनं अख्ख्या देशाला जल्लोषाचं कारण दिलं.

 

एका ऐतिहासिक मॅचसाठी टेनिस जगत सज्ज होतं..या दोन्ही ग्लॅडिएटर्सनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर प्रवेश केला. आणि कोर्टवर आणि कोर्टाबाहेर जमलेल्या हजारो फॅन्सनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्या. जॉकोविकची सुरुवातच अडखळती झाली. पण 3 ब्रेक पॉईंट वाचवत त्यानं पहिला गेम जिंकला.पण ही तर फक्त सुरुवात होती. कारण त्यानंतर दोघांनाही सर्व्हिस राखण्यात यश मिळालं नाही.. पण मरेनं यात बाजी मारली. आणि 59 व्या मिनीटालाच मरेनं पहिला सेट 6-4 नं जिंकला.

 
वर्ल्ड नंबर वन जॉकोविकनं दुसर्‍या सेटची सुरुवात झोकात केली. आणि सेटमध्ये 4-1 अशी आघाडी घेतली. पण मरेनं झुंजार खेळ केला. आणि सलग 3 गेम जिंकत 4-4 अशी बरोबरी साधली. जॉकोविकचं नैराश्य जाणवत होतं. चेअर अंपायरवर त्यानं नाराजी व्यक्त केली. आणि मरेनं पुन्हा एकदा 11 व्या गेममध्ये त्याची सर्व्हिस भेदत जॉकोविकला धक्का दिला. आणि आपल्या नवव्या एसबरोबर मरेनं मॅचमध्ये 2 सेटची आघाडी घेतली. पण तिसरा सेट सोपा नव्हता. मरेनं जॉकोविकची सर्व्हिस सुरुवातीलाच भेदली पण स्वतःची सर्व्हिस राखण्यातही त्याला अपयश आलं.
जॉकोविकनं पुन्हा एकदा 4-2 नं आघाडी घेतली खरी पण मरेनं तुफान खेळ करत 4-4 नं बरोबरी साधली. आणि अखेर तो क्षण आला… पण स्वतःच्या सर्व्हिसवर 3 मॅच पॉईंट असतानाही जॉकोविकला त्यानं गेम जिंकू दिला. सेंटर कोर्टवरचा तणाव शिखरावर पोहोचला होता. पण अखेर तीन तासांच्या या शर्थीनंतर ब्रिटनला 77 वर्षांनंतर त्यांचा पहिला विम्बल्डन चॅम्पियन मिळाला.
मरेचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलंय. पण त्याचा जॉकोविकच्या वर्ल्ड नंबर वन रँकिंगवर परिणाम होणार नाही. पण मरेला त्याची चिंता नाही. हा क्षण अँडी मरेचा होता. आणि त्यानं त्याच्या देशाला जल्लोषाचं कारण दिलं होतं.

अँडी मरेच्या कामगिरी

विम्बल्डन – 2013
यू. एस. ओपन – 2012
ऑलिम्पिक गोल्ड – 2012 (सिंगल्स)
ऑलिम्पिक सिल्व्हर – 2012 (डबल्स)

close