का झाला राष्ट्रवादीचा पराभव?

July 8, 2013 9:11 PM0 commentsViews: 2041

आसिफ मुरसलसोबत अद्वैत मेहता, सांगली

08 जुलै : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगलीच्या महापालिकेत निवडणुकीचा आज निकाल लागला. मतदान झालेल्या 76 पैकी 40 जागा मिळवत काँग्रेसने राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय. तिकडे, भाजपच्या आघाडीला जेमतेमच प्रतिसाद मिळाला. शिवसेना तर खातंही उघडू शकली नाही.

10 वर्ष जुन्या सांगली – मिरज – कुपवाड महापालिकेत दुसर्‍यांदा सत्तांतर झालंय. राष्ट्रवादीच्या महाआघाडीला धूळ चारत काँग्रेसने एकहाती विजय मिळवलाय. राज्यातले सर्व दिग्गज प्रचारासाठी उतरल्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस जिंकल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसलाय.

मतदानाच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीचे उमेदवार पैस वाटताना पकडले गेले होते. पण हे राष्ट्रवादीच्या पराभवाच्या अनेक कारणांपैकी फक्त एक कारण होतं. गेल्या 5 वर्षांत राष्ट्रवादीच्या महाआघाडीने लोकांची निराशच केली.

राष्ट्रवादीला फटका
– रस्ते, पाणी, ड्रेनेज या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं
– इदि्रस नायकवडींची कारकीर्द वादग्रस्त ठरली; त्यांनी शेवटी काँग्रेसला मदत केली
– राष्ट्रवादीने अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिले
– काँग्रेसने हा प्रचारादरम्यान महत्त्वाचा मुद्दा बनवला
– त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसवर गुंडगिरीचा आरोप केला
– राष्ट्रवादीचा हा दुटप्पीपणा आणि प्रचाराचा स्तर लोकांना पसंत पडला नाही
– उलट काँग्रेसने नियोजनपूर्वक प्रचार
– पतंगराव आणि मदन पाटील यांनी अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकदिलाने काम केलं

पण प्रचारात डरकाळ्या फोडणार्‍या एकाही राष्ट्रवादीच्या नेत्याने पुढे येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारली नाही. ही निवडणूक स्थानिक असली, तरी याचे परिणाम राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतात. तसंच, या निवडणुकीमुळे आघाडीतले मतभेद अधिक तीव्र पद्धतीने लोकांसमोर आलेले दिसले.

close