रुपयाने केला सैन्याचा वांदा

July 9, 2013 3:35 PM0 commentsViews: 773

indian army09 जुलै : आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण थांबायला नाव घेत नाहीय आता याचा फटका सैन्यालाही बसलाय. रुपयाचं अवमूल्यन थांबत नसल्यानं तेलाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे इंधनावरचा खर्च 4 ते 5 टक्क्यांनी कमी करा, अशी सूचना केंद्र सरकारने सैन्याला दिलीये. इंधनाचे दर वाढल्यामुळे सैन्याचं बजेट कोलमडलंय, त्यामुळे सैन्य बजेटची फेरआखणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. दरम्यान, इंधनकपातीचा प्रशिक्षण किंवा आवश्यक हालचालींवर परिणाम होणार नाही, असं सैन्यातर्फे सांगण्यात आलंय.

 

रूपयाची घसरण होऊन डॉलरमागं 60 रुपये 95 अशी निचांकी पातळी गाठली. शुक्रवारी रुपया 60 रुपये 23 पैशांवर बंद झाला होता. यापूर्वी रुपयाने 60 रुपये 76 इतका निचांक गाठला होता. अमेरिकेने रोजगार निर्मितीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावल्याचा परिणाम रुपयावर झाल्याचं सांगण्यात येतंय. रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाल्यामुळे अमेरिकी सरकार आपल्या नागरिकांना देत असलेल्या स्टिम्युलस पॅकेजमध्ये कपात करेल, परिणामी भारतात अमेरिकी रोख्यांची खरेदी वाढेल. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अमेरिकी रोख्यांची विक्री करतील, आणि त्याचा परिणाम होऊन भारताची आर्थिक तूट वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.

close