निवडणुकीच्या जागावाटपासाठी काँग्रेसची समिती स्थापन

January 20, 2009 4:39 AM0 commentsViews: 4

20 जानेवारी मुंबईलोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बोलणी सुरू होत आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं विशेष समिती स्थापन केली. या समितीत आजी-माजी मुख्यमंत्र्यासह 6 सदस्य असणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनंही चर्चेसाठी आपली टीम तयार केली. फेब्रुवारीच्या दुस-या – तिस-या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 26 जागांची मागणी करत राष्ट्रवादीनं आधीच रणशिंग फुंकलं आहे. मतदारसंघाची फेररचना झाल्यामुळे जागावाटपाचे जुने निकष बदलावेत अशी दोन्ही काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळे यंदा जागावाटपावर दोन्ही काँग्रेसमध्ये बराच खल घातला जाणार आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं ज्येष्ठ सदस्यांची विशेष समिती नेमली आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख गुरुदास कामत तसंच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा समावेश आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जागांचा फेरआढावा घेण्यासाठी या विशेष समितीची मंगळवारी मुंबईत पहिली बैठक होणार आहे. पण तत्पूर्वी सोमवारी संध्याकाळी अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रणव मुखर्जी आणि ए.के. अँटोनी या पक्षश्रेष्ठीशी चर्चा केली.याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले,आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या हिश्श्यांला किती जागा येतील याबाबत चर्चा करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. ह्या समितीची मुंबईत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बैठक होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीनंसुद्धा जागावाटपाच्या चर्चेसाठी आपली टीम तयार केली. प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा या टीममध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवर चर्चेचं गु-हाळ पार पडल्यानंतर प्रत्यक्ष वाटाघाटी मात्र दिल्लीत पार पडेल.

close