गुन्हेगार नेत्यांची आमदार-खासदारकी रद्द होणार

July 10, 2013 4:34 PM3 commentsViews: 1748

suprim cort________सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय_________

10 जुलै :  गुंड, भ्रष्ट नेत्यांना बळजबरीने सहन करणार्‍या तमाम भारतीयांना सुप्रीम कोर्टाने दिलासादायक निर्णय दिला आहे. आता देशातल्या कलंकित लोकप्रतिनिधींना चाप बसणार आहे. लोकप्रतिनिधी जर एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याचं सदस्यत्वच त्याच दिवशी रद्द होणार आहे असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे. तसंच याविरोधात अपिल करण्यास लोकप्रतिनिधींना तीन महिन्याची मुभाही मिळणार नाही. गुन्हेगारी प्रकरणात ज्या लोकप्रतिनिधी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली अशा गुंड नेत्यांना हा नियम लागू होणार आहे.

कोर्टाने आजपासून हा आदेश लागू केला असला तरी या पुढील येणार्‍या प्रकरणात दोषी आढळणार्‍या नेत्यांवर या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र या अगोदर ज्या गुन्हेगारी खटल्यात दोषी आढळलेल्या नेत्यांविरोधात कोर्टात खटला चालू आहे अशा नेत्यांना हा नियम लागू होणार नाही.

पुर्वी कायद्यानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली तर त्याविरोधात याचिका दाखल करण्यास त्याला तीन महिन्याची मुदत मिळत होती. तोपर्यंत त्या लोकप्रतिनिधीचं सदस्यत्त्व रद्द होत नाही. सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांचं सदस्यत्त्व रद्द होत नव्हते. किंवा त्या लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्यानंतर कोर्ट आपला निर्णय देत असे. लोकप्रतिनिधींना कलम 8(4) नुसार हा अधिकार देण्यात आला होता. आता मात्र सुप्रीम कोर्टाने हा नियमच रद्द केला आहे. त्यामुळे दोषी आढळल्यानंतर नेत्यांची आमदारकी अथवा खासदारकी जाणार हे निश्चित.

तसंच कोणताही व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा मिळाली असेल तर त्याला निवडणूक लढता येत नाही. शिक्षा भोगल्यानंतर त्याला सहा वर्षांनंतर निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने याचिकादाराच्या बाजूने निकाल देत हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
– कलंकित लोकप्रतिनिधींना चाप बसणार
– कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर सदस्यत्व रद्द होणार
– आजपासून निर्णय लागू होणार
– लोकप्रतिनिधी कायद्याचा आधार देत सुप्रीम कोर्टाचा निकाल
– त्यामुळे गुंड, भ्रष्ट नेत्यांची आता आमदारकी किंवा खासदारकी जाणार

close