रत्नागिरीकरांवर जमीन खचण्याची टांगती तलवार

July 10, 2013 2:45 PM0 commentsViews: 286

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

10 जुलै : 2 जुलै रोजी कोकणात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं पाच बळी घेतले आणि कोट्यवधीचं नुकसानही केलं. पण पुराचं पाणी आता ओसरलं असलं तरी अनेक गावांवर टांगती तलवार आहे ती जमीन खचण्याची…

2 जुलैला चिपळूण-संगमेश्वर भागात आलेल्या पुरामुळे कासे आणि धामापूर गावात मोठ्या प्रमाणात भुस्खलन झालं. कासे मधल्या डोंगराला भेगा जाऊन दरडीचा काही भाग तर थेट इथल्या घरांवरच कोसळला. त्यामुळे डोंगराला लागूनच असलेल्या या घरांना आता धोका आहे. तर दुसरीकडे धामापूर गावातही डोंगराचे दोन मोठे भाग कोसळून रस्त्यावर आल्यामुळे सात गावांना जोडणारा रस्ताच बंद झाला.

कोकणात भुस्खलनाचे प्रकार काही नवीन नाहीत. 2005 मध्ये 200 हून अधिक बळी घेणार्‍या रायगड मधल्या भुस्खलनानंतर ही या प्रकारात वाढ होतेय.

भूस्खसलन वाढलं
– सप्टेंबर 2009 मध्ये राजापूर मधल्या शिवणे बुद्रुक गावात जमीन खचली आणि संपर्क तुटला.
– 31 सप्टेंबर 2009 ला राजापूर मधल्या वडदहसोळ गावात डोगर घरावर कोसळून 8 जणांचा बळी गेला.
– 18 जुलै 2010 मध्ये दापोलीमधल्या कर्दे गावातला डोंगर खचला.
– 15 जून 2013 ला खेडमधल्या भरणे गावातला डोंगराचा मोठा भाग नातूनगर धरणाच्या कालव्यात कोसळला.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदलत जाणारा पाऊस आणि भूगर्भातल्या हालचालीची वाढ यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचं तज्ञांचं मत आहे. भूगर्भातल्या हालचाली अशा वाढलेल्या असताना दुसरीकडे मात्र कोकणात प्रचंड वृक्षतोड, बेसुमार वाळू उपसा आणि मायनिंगसारखे उद्योग सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही हे जरी खरं असलं तरी मानवाकडून अशा आपत्तींना निमंत्रण मिळू नये अशी खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी.

उत्तराखंड मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने पर्यावरण आणि विकासासंबंधी उपस्थित होणार्‍या अनेक प्रश्नांवर गांभिर्याने विचार करण्यास भाग पाडलंय. असं असतानाही डॉ. माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीच्या पश्चिम घाट अहवालावर निर्णय घेण्यात सरकारकडून चालढकलच केली जातेय.

close