ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचं निधन

July 12, 2013 9:53 PM1 commentViews: 757

pran-read12 जुलै: बॉलिवूडमध्ये नायक-खलनायक असा प्रवास करणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांच वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 92 वर्षांचे होते. प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभुमीत त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहे.

बॉलिवूडमधले ते खलनायक होते. तब्बल सहा दशकं त्यांनी खलनायक म्हणून पडदा गाजवला. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची जंजीरमधली त्यांची शेरखानची भूमिका अजरामर आहे. 2 फेब्रुवारी 1920 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी एका स्टुडिओत कॅमेरा डिपार्टमेंटमधून केली. त्यानंतरच्या काही वर्षांतच ते बॉलीवूडचे लोकप्रिय खलनायक झाले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. नुकताच त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मान करण्यात आला होता.

प्राण यांचा जीवन प्रवास

ते स्टार व्हिलन .. देखणे.. त्यांच्यामुळे त्यांचे हिरोही उठून दिसायचे.. प्राण.. म्हणजेच प्राण क्रिश्न सिकंद.. लाहोरमध्ये 2 फेब्रुवारी 1920ला जन्म.. लाहोरमध्येच पंचोली स्टुडिओत प्राण यांचं करिअर सुरू झालं ते कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये.. बॉलिवूडच्या या व्हिलननं नंतर कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांची पहिली भूमिकाही खलनायकाचीच होती. 1940 मध्ये दलसुख पंचोली यांच्या पंजाबी सिनेमा ‘यमला जाट’मध्ये ते खलनायक होते. त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या खानदान सिनेमात प्राण नायक होते. आणि फाळणीपर्यंत त्यांना नायकाच्याच भूमिका मिळत होत्या.

फाळणीनंतर मुंबईला आलेल्या प्राण यांना थोडा संघर्ष करावा लागला. पण लेखक सादत हसन मांटो यांच्या मदतीनं त्यांना जिद्दीमध्ये भूमिका मिळाली. जिद्दीचे हिरो होते देव आनंद.. आणि हा सिनेमा प्राण यांच्या करियरमधला टर्निंग पाँइंट बनला.

प्राण यांनी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासोबत जास्तीत जास्त काम केलंय. औरत, बडी बहेन, जिस देस मे गंगा बहती है, हाल्फ टिकिट, पुरब और पश्चिम, डॉन, अमर अकबर अँथनी, जंजीर… प्राण यांच्या या सिनेमांतल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. उपकार, आँसू बन गये फूल आणि बेईमान सिनेमांसाठी प्राण यांना सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळालं.. 1997मध्ये फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला…2001मध्ये पद्मभूषणनं त्यांचा गौरव केला गेला.. तर 2010मध्ये दादासाहेब फाळके ऍकॅडमीतर्फे त्यांना सन्मानित केलं गेलं.

भारतीय सिनेमांमध्ये खलनायक म्हणून अजरामर झालेले प्राण यांचा अभिनय कधीच एकसुरी झाला नाही. त्यांनी काही विनोदी भूमिकाही केल्या.. 1997मध्ये अमिताभ बच्चनच्या मृत्यूदाता सिनेमात त्यांनी शेवटची भूमिका केली. 350पेक्षा जास्त सिनेमे करणारे प्राण प्रेक्षकांसाठी कायमचे आवडते खलनायक होते..त्यांना आयबीएन-लोकमतची आदरांजली…

प्राण यांचे गाजलेले चित्रपट

 • खानदान – 1940
 • बरसात की एक रात – 1948
 • आझाद – 1955
 • देवदास – 1956
 • मधुमती – 1958
 • जिस देश मे गंगा बहती है – 1960
 • हाफ टिकट – 1962
 • कश्मिर की कली – 1964
 • गुमनाम – 1965
 • राम और शाम – 1967
 • उपकार – 1967
 • जॉनी मेरा नाम – 1970
 • व्हिक्टोरिया नं. 203 – 1972
 • जंजीर – 1973
 • धरम वीर – 1977
 • डॉन – 1978
 • नसीब – 1981

प्राण यांचा पुरस्कारांनी गौरव

- 2013 – दादासाहेब फाळके पुरस्कार
- 2001 – पद्मभूषण
- 1997 – फिल्म फेअर जीवनगौरव पुरस्कार
- 1967, 1969, 1972 – फिल्म फेअर पुरस्कार

 • Deepak Modi

  Pran the toh hero mein jaan thi, agar na hote toh hero ke pran nikal jate.

close