निवडणुकांआधी मिळणार स्वस्तात जेवण !

July 13, 2013 8:00 PM0 commentsViews: 726

पल्लवी घोष, नवी दिल्ली

13 जुलै : केंद्रातल्या यूपीए सरकारने निवडणुकांची पूर्ण तयारी केलीय. सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी येत्या 20 ऑगस्टपासून देशभरात होणार आहे. 20 ऑगस्ट हा माजी पंतप्रधान राजीव गांधींचा वाढदिवस. त्यामुळे काँग्रेसला या योजनेचा पुरेपर वापर लोकसभा निवडणुकांसाठी करायचाय हे स्पष्ट आहे. पण विरोधक आणि जाणकार हे याबाबतीत अजिबात खुश नाहीत.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती जाहीर केलीये. महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजना येणार्‍या निवडणुकीत हुकमाचा एक्का ठरेल, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. 2009च्या निवडणुकांमध्ये जो फायदा शेतकर्‍यांची कर्ज माफ करून झाला, तसाच फायदा यावेळी अन्न सुरक्षेमुळे होईल, अशी काँग्रेसच्या धुरिणांना आशा आहे

गांधी नावाचा पुरेपूर वापर करण्यासाठी पक्षाने मोठ्या चतुराईने अध्यादेश लागू करण्यासाठी राजीव गांधींचा वाढदिवसच निवडला. पण टीकाकारांचं असं म्हणणं आहे की, अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा अजून उभी नाहीय. अधिकार्‍यांना अजून सूचना मिळायच्या आहेत आणि धान्याचा साठाही पुरेसा नाहीये. यामुळे काँग्रेसच्या स्वप्नांना तडे जाऊ शकतात.

सोनिया गांधींचा असा मनसूबा आहे की ,गरिबांना स्वस्तात अन्न देणार्‍या या योजनेची अंमलबजावणी काँग्रेसशासित राज्यांनी सर्वातआधी करावी. जेणेकरुन फक्त काँग्रेसला सामान्य माणसाच्या भल्याची चिंता आहे, असा संदेश जाईल. पण वास्तव असं आहे की, कित्येक बिगर-काँग्रेसशासित राज्यांमध्ये याआधीच विविध अन्न योजना कार्यरत आहेत. यात सर्वात लोकप्रिय आहेत तामिळनाडूतल्या जयललितांच्या इडल्या.

अन्न सुरक्षा याजनेची पहिली परिक्षा असेल ती म्हणजे दिल्लीच्या निवडणुका. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही अन्न सुरक्षा योजना आधीपासून सुरू आहेत. पण इतर राज्यांमध्ये या योजनेचा राजकीय फायदा मिळेल. आणि घसरत चाललेला काँग्रेसच्या लोकप्रियतेचा आलेख सुधारेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे.

close