राऊतांच्या राजीनामा नाट्यामागे माणिकरावांचा गेम?

July 15, 2013 8:38 PM0 commentsViews: 597

15 जुलै

पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याच्या नाट्यामुळे. पण राऊतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी फूस लावून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याची चर्चा आहे.

नागपूरमधल्या एंप्रेस मिलच्या जागी उभारलेली बेगनबाग सध्या राज्यभर गाजतीये ती नितीन राऊत यांच्या राजीनामा नाट्यामुळे. या सोसायटीत ते अनधिकृतपणे राहतायत. गरिबांच्या नावाखाली आपलं अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी ते सरकारवर दबाव आणतायत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

आणि या दबावाला मुख्यमंत्री दाद देत नसल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचं नाटक केलं. पण काही तासातच घूमजावही केलं. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमध्ये चांगलंच बिनसलेल आहे. यवतमाळ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंच्या मुलाचं तिकीट कापलं तेव्हापासूनच मुख्यमंत्र्यांच्याविरोधात नाराज आहेत. आधी सांगलीत जयंत पाटील यांच्या काँग्रेस संपर्काची बातमी फोडून माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

प्रत्येक वेळी मुख्यमंत्री माणिकरावांच्या चालीचा बिमोड करतात. पण यावेळी.. विदर्भातल्याच नितीन राऊतांचं मंत्रीपद काढून घेतलं तर माणिकरावांचा फायदा होऊ शकतो आणि जर त्यांचं मंत्रीपद शाबूत ठेवलं तर इतर मंत्री राऊतांचा कित्ता गिरवू शकतात. अशा दुहेरी कात्रीत मुख्यमंत्री सापडले आहेत.

close