ताकदीनुसार जागावाटप करावं : राष्ट्रवादीची मागणी

January 21, 2009 3:10 PM0 commentsViews: 1

21 जानेवारी, दिल्लीलोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस 27 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी दिली आहे. शिवाय पवार पंतप्रधान व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युपीएनं राष्ट्रवादीच्या ताकदीनुसार जागांचं वाटप करावं, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याप्रमाणं जागा न मिळाल्यास इतर पक्षांशी चर्चेचा मार्ग मोकळा असल्याचा इशाराही त्रिपाठींनी दिला. काँग्रेस मित्रपक्षांना बरोबर घेत नाही, असा आरोपही त्यांनी केला.केरळ, मणीपूर, मेघालय, ओरिसा आणि आसाममध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आज आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या. देवेगौडा किंवा चंद्रशेखर जर कमी जागा असताना पंतप्रधान होऊ शकतात तर पवार का नाही ? असा सवाल त्रिपाठी यांनी विचारला. इतर पक्षांशी युती करून जर पवार पंतप्रधान होऊ शकत असतील, तर तो पर्याय खुला असल्याचे संकेत राष्ट्रवादीने दिला आहे. समाजवादी पक्षाशी राष्ट्रवादीची चर्चा करत असल्याचंही त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं. युपीएच्या अंतर्गत एक दबावगट बनवला जात असल्याची चर्चा यानिमित्तानं सुरू झाली आहे.

close