पुरोहितला बनवायचं होतं स्वतंत्र हिंदू राष्ट्र

January 21, 2009 6:06 PM0 commentsViews: 8

21 जानेवारी मुंबई रवींद्र आंबेकरसह अजित मांढरेहिंदू राष्ट्राचं निर्वासित सरकार निर्माण करण्याची पूर्ण योजना लेफ्टनंट कर्नल पुरोहितकडे होती. तसंच सोनेरी किनार असलेला भगवा झेंडा त्यानं तयार केला होता. एवढंच नव्हे तर हिंदू राष्ट्रासाठी इस्त्रायल, नेपाळ आणि थायलंड देशातून मदत मागितली होती. दोन वर्ष या कटाची तयारी सुरू होती. पण मालेगाव बॉम्बस्फोटात पुरोहित आणि पांडे पोलिसांच्या हाती लागले. आणि देशद्रोहाचा भयानक कट उघड झाला.लेफ्टनंट कर्नल पुरोहितनं टीम चांगली तयार केली होती. जम्मूच्या शारदा पीठाचा शंकराचार्य नाव स्वामी अमृतानंद उर्फ सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे, एक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय आणि सोबत होते अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते. काही संघ परिवाराचे कार्यकर्ते त्यांना बनवायचं होतं समांतर सरकार. सरकारमध्ये कुठली खाती असावीत याचाही आराखडा तयार होता. यासाठी होत होत्या बैठकावर बैठका. समांतर सरकारमध्ये अर्थ मंत्रालय, सामान्य प्रशासन, माहिती आणि प्रचार खातं, कायदा आणि सुव्यवस्था आणि परराष्ट्र मंत्रालय अशी खाती असतील याची चर्चा बैठकीत केली गेली. सरकारमध्ये संरक्षणमंत्र्याला नाव दिलं युद्धमंत्री. एक कोटी सैनिक असलेलं सैन्य उभारण्याची योजना आखली गेली. यासर्वांवर धर्माचा अंकुश असेल असं ठरवण्यात आलं. एवढंच नाहीतर सत्तेत असलेल्या सरकारला पाडण्यासाठी परकीय देशांच्या मदतीची तयारीही पुरोहितनं केली होती. इस्त्रायल आणि नेपाळ या देशांच्या संपर्कात कर्नल पुरोहित होता. संयुक्त राष्ट्रात देशाला हिंदू राष्ट्र म्हणून समर्थन मिळवणं, ट्रेनिंग आणि शस्त्रसाठा, राजकीय मान्यता यासारख्या अनेक बाबींवर या बैठकित चर्चा करण्यात आली. तसंच नेपाळकडून अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग मिळावं याची बोलणीही करण्यात आली होती. म्हणजेच देशातील एक लष्करी अधिकारी आपल्याच देशातील सरकार आणि राज्यघटनेला संपवण्यासाठी परदेशाची मदत घेत होता. अभिनव भारत या संघटनेचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता त्यामुळेच एक सेंट्रल हिंदू सरकार बनवायचं ठरलं. ही संघटना तीन स्थरांवर काम करणार होती.आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राजकीय या तीन स्थरांवर. परकीय देशाच्या मदतीनं देशाच्या सीमांवर ताबा मिळवणं आणि सरकार स्थापन करणं.अभिनव भारतचा सर्वेसर्वा कर्नल पुरोहित याला 2024 पर्यंत देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं होतं. देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील भोकं कर्नल पुरोहितला चांगल्या प्रकारे माहित होत्या. याच्याच फायदा घेऊन त्यानं बॉम्बस्फोटाचा कट रचला. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचावं याकरता एक न्यूज चॅनल उघडण्याचा विचारही कर्नल पुरोहितचा होता. मात्र नंतर एक मीडिया कॉलेज चालवण्याचा निर्णय घेतला गेला. अभिनव भारतनं प्रशिक्षण दिलेले 25 ते 26 विद्यार्थी दिल्लीत अनेक न्यूज चॅनलमध्ये काम करत आहेत.

close