मिड-डे मिल विषबाधा :22 जणांचा मृत्यू

July 17, 2013 3:54 PM0 commentsViews: 243

bihar4417 जुलै : बिहारमधल्या छप्रामध्ये धरमसती गावात मिड डे मिल खाल्यानं विषबाधा होऊन दगावलेल्या मुलांची संख्या 22वर पोचलीय. तर 50 जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आज दिवसभर हिंसक निदर्शनं झाली. दरम्यान, मिड डे मिल खाल्याने बिहारमध्येच आणखी 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मधुबनी जिल्ह्यातल्या सरकारी शाळेत ही घटना घडलीय. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बिहारमधल्या छप्रामध्ये लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या, अनेक गाड्या बेचिराख करण्यात आल्या, रस्त्यावरची वाहतूकही पूर्णपणे ठप्प करण्यात आली. मिड डे मिल योजनेअंतर्गत मिळालेल्या अन्नातून विषबाधा झाल्यानं 20 हून जास्त विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे संपूर्ण छप्रा जिल्ह्यातच हा संताप उफाळला.

चित्रा देवीनं तर तिची दोन नातवंडं गमावलीत. दोघांनी गेल्या आठवड्यातच शाळेत ऍडमिशन घेतली होती. एकूण 25 कुटुंबीयांची ही व्यथा आहे. राज्यात एवढी मोठी घटना घडूनही राज्य सरकारनं तात्काळ कारवाई न केल्यानं विरोधकांनीही नितीश कुमारांना लक्ष्य केलं. या घटनेला दोषी असलेल्यांना शिक्षा होईलही. पण, ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं त्यांचं नुकसान बिहार सरकार कसं भरून काढणार…

close