शरद पवारांना पंतप्रधान बनवण्याची जोरदार तयारी

January 22, 2009 9:02 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी दिल्लीआशिष दीक्षितशरद पवारांना देशाचे पुढचे पंतप्रधान बनवण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीनं सुरू केली आहे. दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादीच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेसबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली. त्यामुळे येणा-या लोकसभा निवडणुकीनंतर युपीएला तडे जातील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.शरद पवार भारताचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी आता चांगल्याच आक्रमक पवित्र्यात आहे. येणा-या लोकसभेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आणि तिस-या आघाडीचं सरकार आलं तर पवार हे सर्वमान्य नाव म्हणून पुढं यावं यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे.राष्ट्रवादीच्या विस्तारित कार्यकारणीने काँग्रेसच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. केरळ, आसाम आणि अन्य तीन राज्यात काँग्रेसनं आम्हाला जागा सोडल्या नाहीत तर आम्ही त्या राज्यात अन्य पक्षांशी युती करू असा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिला आहे. डावे आणि समाजवादी पार्टी यांच्या बरोबरच शरद पवार राजद आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्याही संपर्कात असल्याचं कळतंय. एकूणच काँग्रेसपासून दुरावत चाललेल्या सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करण्याचं काम राष्ट्रवादीनं सुरू केलं आहे.युपीएमध्ये पंतप्रधानपदाची जागा रिक्त नाही आणि मनमोहनसिंग हेच आमचे नेते आहेत असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. पण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुन्हा उतरण्यास मनमोहनसिंग उत्सुक नसल्याचं विश्‍वसनीय सुत्रांकडून समजतंय. तसंच काँग्रेसची देशभरातील स्थिती फारशी चांगली नसताना राहुल गाधींचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं करणं काँग्रेसला जोखमीचं वाटतंय. काँग्रेसच्या याच अशक्त आणि अनिश्चित परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रवादीनं पवारांचं नाव पंतप्रधानपदासाठी आक्रमकपणे मांडणं सुरू केलं आहे.

close