बाळासाहेबांच्या पुतळ्यावरुन सेना-मनसेत चढाओढ

July 17, 2013 11:08 PM0 commentsViews: 1024

sena mns17 जुलै : विधानभवन आवारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा, या मागणीसाठी शिवसेना आणि मनसेत चढाओढ लागलीय. शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेच्या सभापतींकडे विधानभवनाच्या आवारात बाळासाहेबांचा पुतळा उभारावा असं पत्रक दिलंय. पण मनसेनं नागपूर अधिवेशनातच ही मागणी केली होती, असा दावा मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

विधानभवन परिसरातल्या पुतळ्यांचा आढावा घेण्यासाठी उद्या गुरूवारी दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांची बैठक होतेय. विधानभवनाच्या आवारात चार माजी मुख्यमंत्र्यांचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे बाळा नांदगावकर यांनी या अगोदरही इस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती.

पण नांदगावकर यांच्या मागणीच्या अगोदरच रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी फ्रीवेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र नांदगावकरांनी मी असं काही ऐकलं नाही असा दावा केली होता. आता बाळासाहेबांच्या पुतळ्यावरून मनसे-शिवसेना आमनेसामने उभी ठाकली आहे.

close