‘मंत्र्यांनाच निलंबित का करू नये?’

July 18, 2013 10:01 PM0 commentsViews: 519

18 जुलै : विदर्भात मागिल महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे शेतकर्‍यांचं प्रचंड नुकसान झालंय. यावर आज विधानसभेत लक्षवेधी चर्चा घेण्यात आली पण या सभेला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गैरहजर होते त्यामुळे महाराष्ट्राच्या लक्षवेधी चर्चेला जर मंत्रीच जर हजर राहत नसेल तर मंत्र्यांनाच निलंबित का करु नये असा संतप्त सवाल करत उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी मंत्र्यांची कानउघडणी केलीय. महत्त्वाच्या चर्चेवेळी आणि प्रश्नोत्तरांच्या तासात अनेक मंत्री वारंवार गैरहजर असतात. मंत्र्यांची ही गैरहजेरी अतिशय गंभीर बाब आहे असे खडेबोलही पुरके यांनी सरकारला सुनावले.

 

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे विदर्भातील शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान झालं. कुणाची घरं पडली, कुणाची शेती वाहून गेली यावर आम्ही लक्षावेधी चर्चेची मागणी केली आणि ती सुरूही झाली पण मंत्रीच उपस्थित नव्हते. ही अत्यंत शर्मेची बाब आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नाना पटोले यांनी दिली. अशा लक्षवेधी चर्चा असो अथवा कोणतीही चर्चा असो मंत्री जर गैरहजर राहत असतील त्यांना निलंबित करावं हे अगदी योग्य आहे.

 

आम्ही उपाध्यक्षांच्या मताशी पूर्ण सहमत आहोत आणि राज्यातील आमदारांनीही याला पाठिंबा द्यावा अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे मुख्यमंत्री पंढरपूरला गेले आहे. उद्या त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा होणार आहे. तर अनेक मंत्रीही पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे ऐन अधिवेशनात सभागृह ओस पडलेय. सभागृह ओस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही असे प्रकार अनेक वेळा घडलेत त्यामुळेच आज पहिल्यांदाच उपाध्याक्षांनी मंत्र्यांना खडबोल सुनावले आहे.

close