अखेर ध्यानचंद यांची भारतरत्नसाठी शिफारस

July 19, 2013 4:12 PM0 commentsViews: 262

dhanchand19 जुलै : हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या नावाची प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. बुधवारी क्रीडा मंत्रायलाची बैठक पार पडली या बैठकीत ध्यानचंद यांचं नामांकन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतरत्न पुरस्कारासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचीही चर्चा होती. पण सचिन तेंडुलकर अजून क्रिकेट खेळत आहे आणि भविष्यात त्याला भारतरत्न पुरस्कार मिळू शकतो अशी भूमिका या बैठकीत घेतली गेली. ध्यानचंद यांच्या नावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिल्यास भारतरत्न पुरस्कार मिळणारे ते पहिले खेळाडू ठरतील. ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारतानं 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं.

 

गेल्या तीन वर्षांपासून भारतरत्न खेळाडूंना द्यावा यावरून बरीच चर्चा आणि मागणी झाली. पण खेळाडूंना भारतरत्न देण्याचा नियम नव्हता. अखेर 16 डिसेंबर 2011 ला हा अडथळा दूर झाला. त्यामुळे धान्यचंद आणि सचिन तेंडुलकर यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी आणखी जोर धरू लागली. साहजिकच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी मागणी जास्त प्रमाणावर होती. अनेक राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांनी ही मागणी लावून धरली होती. पण ध्यानचंद यांना अगोदर भारतरत्त्न देण्यात यावा अशी मागणीही अनेकांनी केली. सचिनसोबत हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यानाही पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि क्रीडा मंत्री माकन यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता. अखेर या शर्यतीत ध्यानचंद यांनी बाजी मारली असून त्यांच्या नावाची शिफारस कऱण्यात आलीय. नियमानुसार, भारत रत्न पुरस्कारासाठी पंतप्रधान थेट राष्ट्रपतींना शिफारस करतात. स्वरभास्कर भीमसेन जोशी हे या पुरस्काराचे शेवटचे मानकरी. येत्या ऑगस्टमध्ये आता या भारत रत्नांच्या पंक्तीत ध्यानचंद यांचा समावेश होणार आहे.

close