पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा

July 19, 2013 5:48 PM0 commentsViews: 401

19 जुलै : आज आषाढी एकादशी…पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचा आज कळस सोहळा…हरीनामाचा जयघोष करत जवळपास 12 लाख वारकरी पंढरपुरात जमलेत. विठुरायाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागेत स्नान करण्यासाठीही भक्तांची गर्दी केलीय. यंदा पावसाची सुरूवात वेळेवर आणि चांगली झाल्यानं पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी मोठ्या संख्येनं वैष्णवांचा मेळा जमलाय. परंपरेप्रमाणे आज पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यंदा वारकर्‍यांमधून मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान जालना जिल्ह्यातल्या जाफराबादमधले नामदेवराव देवबा वैद्य आणि गंगूबाई नामदेवराव वैद्य यांना मिळाला. यंदा भाविकांसाठी तीन वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्यात मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन आणि ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी बारा लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कल्याणासाठी विठ्ठलाला गार्‍हाणं घातलं.

close