दुनियादारी-एक राडेबाज प्रेमकहाणी

July 19, 2013 11:03 PM0 commentsViews: 3465

अमोल परचुरे, समीक्षक

सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर त्याच नावाचा सिनेमा… ‘दुनियादारी’चा लूक, त्यातली गाणी याबद्दल बरीच चर्चा तुम्ही ऐकली असेल. सत्तरचं दशक असल्यामुळे अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’चा प्रभाव आणि राजेश खन्ना युगाची सादगी यातल्या कॅरेक्टर्समध्ये दिसते. कादंबरी वाचल्यानंतरचं झपाटलेपण संजय जाधवच्या दिग्दर्शनात स्पष्टपणे जाणवतं. कादंबरीत मांडलेला सगळा पट सिनेमाच्या चौकटीत मांडणं शक्य नसतं, पण तरी कादंबरीत जी रग आहे ती सिनेमात पुरेपूर उतरलेली आहे. गुलजार यांनी ‘मेरे अपने’ मधून बेरोजगारांची समस्या मांडली होती. त्या सिनेमात विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या टोळक्यांचं जे लूक होतं, काहीप्रमाणात तोच प्रकार इथे दिसतो. दुनियेची आणि भविष्याची फिकीर न करता कॉलेज कट्‌ट्यावर रंगलेली ही राडेबाज प्रेमकहाणी सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल अशीच आहे.
काय आहे स्टोरी?

ही दुनिया आहे श्रेयस म्हणजे स्वप्नील जोशीची…पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला भेटते कट्टा गँग…सरळसाध्या स्वभावाचा श्रेयस या कट्टा गँगचा जीवाभावाचा दोस्त बनून जातो. गँगचा म्होरक्या असतो डीसीपी म्हणजेच अंकुश चौधरी, आणि त्यांची दुश्मनी असते साई म्हणजे जितेंद्र जोशीच्या गँगबरोबर…या दोघांची दुश्मनी श्रेयसच्या आयुष्यात बरीच खळबळ उडवते. एकीकडे हे वैर आणि दुसरीकडे प्रेम अशी बरीच दुनियादारी श्रेयसला करायला लागते. कादंबरीत आलेले बारीक बारीक संदर्भ सोडून इथे कट्टा गँग, श्रेयस, डीसीपी, शिरीन, साई, मीनाक्षी यांच्यावरच फोकस ठेवण्यात आलाय. त्यामुळे घटना वेगाने घडत जातात, खासकरुन सिनेमा सुरु झाल्यावर कट्टा गँग, डीसीपी-साईची ठसन, मग प्रेमप्रकरणं हे सगळं एस्टॅब्लिश करण्यात फार वेळ गेलेला नाही. अर्थातच त्यामुळे आपण गुंतून राहतो. एडिटिंगची उत्तम जाण असलेला कॅमेरामन-दिग्दर्शक संजय जाधव आपल्याला बांधून ठेवतो.

dunyadari44

नवीन काय?
सिनेमात कॅरेक्टर्सच्या लूकवर विशेष मेहनत घेतल्याचं तर जाणवतंच, त्यांची हेअरस्टाईल, त्या काळातले कॉश्च्युम्स, जे काही ठिकाणी भडक वाटतात पण केवळ या लूकमुळेच तो काळ उभा राहतो हेही महत्त्वाचं…त्याच कलाकारांना आजी-आजोबा करताना मात्र थोडी घाई झाल्याचं जाणवतं. चेहर्‍यावर सुरकुत्या नाहीत, फक्त केस थोडे पांढरे आणि लहान मुलं त्यांना आजी-आजोबा म्हणतायत ही एवढी एकच गोष्ट अख्ख्या सिनेमात खटकते. दुनियादारीचं यश कशात आहे तर तो सगळ्या वयोगटासाठीचा सिनेमा आहे. सत्तरच्या दशकातलं कॉलेज लाईफ असलं तरी सध्याची तरुणाईसुद्धा तो माहौल मस्त एन्जॉय करेल असा आहे, आज जे पन्नशीत किंवा साठीत आहेत त्यांना आपले कॉलेजचे दिवस आठवून नॉस्टॅल्जिक फिलिंग देणारं आहे.

परफॉर्मन्स
सिनेमाचं संगीत मस्तपैकी ताल धरायला लावणारं आहे. ‘जिंदगी’ आणि ‘टिकटिक वाजते डोक्यात’ ही दोन गाणी तर सतत गुणगुणत राहावीत इतकी डोक्यात फिट्ट बसतात. संजय जाधवने जेव्हा ‘चेकमेट’ बनवला होता तेव्हा सुपरफास्ट एडिटिंगवर बरीच टीका झाली होती. पण खरंतर तो नवा ट्रेंड आणू पाहत होता. ‘रिंगा रिंगा’ नंतर ‘दुनियादारी’मध्ये त्याच्यातला दिग्दर्शक आता आणखी विचारी झालाय. ट्रेंडचा वगैरे विचार न करता जिथे ज्याची जशी गरज असेल त्या टेक्निकचा वापर त्याने केलेला आहे. कास्टींग हा त्यादृष्टीने आणखी एक महत्त्वाचा भाग…’रिंगा रिंगा’मध्ये त्याने भरत जाधवला गंभीर भूमिका दिली आणि प्रेक्षकांनीही भरतला दाद दिली. ‘दुनियादारी’मध्ये संजयने सई ताम्हणकरच्या अभिनयाचा सुंदर वापर केलाय.

 

सईच्या रोलला मस्त शेड्सही आहेत आणि आपला अभिनयही बोल्ड आणि कडक आहे हे सईने इथे दाखवून दिलंय. अंकुशनेसुद्धा आपला रफ अँड टफ रोल मस्त एंजॉय केलाय आणि त्याने साकारलायसुद्धा एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये… सिनेमाचा खलनायक आहे जितेंद्र जोशी…ज्याला बघून राग येईल असा अगदी खराखुरा अभिनय पुन्हा एकदा जितेंद्रने पेश केलाय. सगळ्यात भावखाऊ रोल आहे स्वप्निलचा…लॉजिकला महत्त्व देणारा श्रेयस त्याने मस्त लॉजिकली रंगवलेला आहे. मध्यमवर्गात राहूनही मॉडर्न स्वप्नाळू जगाची आस असणारी मीनाक्षी रंगवताना उर्मिला कानेटकरनेही छान अभिनय केलाय. कट्टा गँगच्या सगळ्या मेंबर्सनीही जबरदस्त हंगामा केलाय. काही सरप्राईझेससुद्धा आहेत…एकंदरित, अदाकारीसाठी, उत्तम दिग्दर्शनासाठी आणि मस्त मनोरंजनासाठी बघायलाच हवी अशी ही दुनियादारी..
‘दुनियादारी’ ला रेटिंग – 75

close