मुंबईकरांना ‘चायनीझ फाईटिंग’ शिकण्याची संधी

July 19, 2013 11:14 PM0 commentsViews: 93

विनायक गायकवाड, मुंबई.
19 जुलै : चीनची संस्कृती, भाषा आणि वुशू खेळ हे आता आपल्यालाही शिकता येणार आहे. आणि तेही चायनीझ मास्टर्सकडून… मुंबई विद्यापीठाच्या 157 व्या वर्धापन दिनानिमित्त चीननं कॉन्फुशियस इन्स्टिट्युटची स्थापना केलीये. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना चीनच्या संस्कृतीचे दरवाजे खुले होणार आहेत.

स्वोर्डफाईट… ताय ची फॅन… झिएँग झिंग क्वुआन… चीनमध्ये खेळल्या जाणार्‍या मार्शल आर्टचे हे काही प्रकार…आणि हे थरारक खेळ आता मुंबईतही खेळले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठात चीननं कॉन्फुशियस इन्स्टिट्युटची स्थापना केलीय.जागतिक सिनेमांतून हे प्रकार आणि त्यांचा जनक असलेला वुशू खेळ आपण सगळ्यांनीच पाहिलाय. ‘क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन’ असो किंवा हॉलिवूडचा ऍक्शन हिरो जेट लीचा तुफान परफॉर्मन्स…चीनच्या संस्कृतीमधील या अविभाज्य घटकाला सर्वांनी नेहमीच पसंती दिलीये.

कॉन्फुशियस इन्स्टिट्युटमध्ये तरुणांना वुशू खेळ आणि त्यातील विविध प्रकार शिकता येणार आहेत. त्यासाठी तियानजीन युनिव्हर्सिटीतील प्रशिक्षित कोच आणि शिक्षक खास चीनहून मुंबईत दाखल झालेत. तलवारबाजी… बांबूच्या सहाय्यानं स्वसंरक्षण…आणि चायनीझ मार्शल आर्ट्सचे हे सर्व लोकप्रिय प्रकार आता खास मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थांना अनुभवता येणार आहेत..

वुशूबरोबरच चीनची संस्कृती, भाषा आणि साहित्यही भारतीय विद्यार्थ्यांना या कॉन्फुशियस इन्स्टिट्युटमध्ये शिकता येणार आहे. जगभरातील 93 देशांत चीननं 300 च्या वर कॉन्फुशियस इन्स्टिट्युट्सची स्थापना केलीये. आणि भारतातील पहिल्या संस्थेचा मान मिळालाय तो मुंबई विद्यापीठाला..त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

close