राणेंबाबत अद्याप निर्णय नाही

January 23, 2009 1:25 PM0 commentsViews: 2

22 जानेवारी दिल्लीआशिष दीक्षितनारायण राणे यांनी राज्य काँग्रेसचे प्रभारी ए. के.अँटनी यांची भेट घेऊन दोन आठवडे उलटले तरी त्यांच्या भविष्याचा निर्णय होत नाही. त्यामुळे राणेंची अस्वस्थता वाढली आहे. राणेंचे समर्थक कन्हैयालाल गिडवानी यांनी अँटनींची भेट घेतली. त्यांनीही लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. पण सगळ्यांना प्रश्न पडलाय की राणेंबाबत निर्णय व्हायला एवढा उशीर का होत आहे.नारायण राणेंची अस्वस्थता दिवसागणिक वाढत चालली आहे. म्हणूनच त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्वत: निलंबित असतानाही काँग्रेसला अल्टिमेटम दिला. त्यावरही काहीही निर्णय होत नाही, हे पाहून त्यांनी आपले समर्थक आमदार कन्हैयालाल गिडवानी यांना अँटनींकडे पाठवलं आणि निलंबन लवकरात लवकर रद्द करा, अशी विनंती केली.काँग्रेसचे राष्टीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी स्पष्ट केलं की, राणेंबद्दलचा निर्णय व्हायला अजून थोडा वेळ लागू शकतो. कारण काँग्रेस पक्षात कोणताही निर्णय अनेक गोष्टींचा विचार करूनच घेतला जातो.निलंबन रद्द करण्याचा निर्णय जवळपास निश्चित आहे पण काँग्रेसमध्येच दोन गट असल्याने जाहीर करायला उशीर होत आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राणेंच्या विरोधात आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोनिया गांधी आणि अँटनींची भेट घेतली होती. तसंच विलासरावांचे मित्र आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असलेल्या अहमद पटेल यांच्यावरही राणेंनी जोरदार आरोप केले होते. त्यामुळे तेही राणेंवर नाखूष आहेत. पण स्वत: मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राणेंची बाजू उचलून धरली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस दिवसेंदिवस आक्रमक होत चालली आहे. त्यामुळे राणेंचं निलंबन रद्द करणं काँग्रेसची गरज आहे. पण ते नेमकं कधी होईल, हे कुणीच सांगू शकत नाही.

close