‘नरेंद्र मोदी पंतप्रधान नकोत’

July 22, 2013 3:36 PM2 commentsViews: 1809

amrtya sen on modi22 जुलै : लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी झंझावाती दौरे आणि बैठका सुरू  केल्या आहेत. पंतप्रधानपदासाठी भाजपनं त्यांच्या नावाची घोषणा केली नसली तरी त्यांच्याकडेच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून बघितलं जातंय. अशा सगळ्या परिस्थितीत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून आपली पसंती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सीएनएन आयबीएनशी त्यांनी खास बातचीत केली. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल रोखठोक मतं मांडली. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केलीय आणि मोदींचं हे मॉडेल आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय. गुजरातमध्ये पायाभूत सुविधा चांगल्या असतील. पण, मोदींनी राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच बहुसंख्याकांसाठीही काहीच केलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रश्न - नरेंद्र मोदी मॉडेल ऑफ गव्हर्नंसबद्दल खूप बोललं जातं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उत्तर - नाही, मला ते मान्य नाही. दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे रेकॉर्डबद्दल मला काय वाटतं. आणि दुसरं म्हणजे मोदींनी जे केलं किंवा करताहेत त्यातून काही शिकण्यासारखं आहे का? जोवर पहिल्या मुद्द्याचा प्रश्न आहे मोदींचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, असं मला वाटत नाही. मला असुरक्षित वाटण्यासाठी मी अल्पसंख्याक असण्याची गरज नाही. असं वाटू शकणारा मी बहुसंख्याकांमधला पण एक भारतीय नागरिक असू शकतो. मला एक भारतीय म्हणून हे स्पष्टपणे सांगयचंय की, अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटेल अशी परिस्थिती अजिबात नकोय. आणि त्यांच्या विरोधात 2002 साली संघटित हिंसा झाली होती. ती एक भयंकर घटना होती. अशा प्रकारचा ज्याचा रेकॉर्ड आहे असा माणूस मला पंतप्रधान म्हणून नकोय.

प्रश्न - तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नकोत?
उत्तर – हो, मला ते पंतप्रधान म्हणून नकोत. ते मुख्यमंत्री म्हणून बरंच काही करू शकले असते. ते अधिक धर्मनिरपेक्ष असू शकले असते. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटू शकलंं असतं. आपण अल्पसंख्याकांना वाईट वागणूक दिली असं बहुसंख्यांकांना वाटलं नसतं. त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाकडं दुर्लक्ष केलं.

 

गुजरात घर खर्चात पिछाडीवर !

गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा गवगवा होत असताना, प्रत्यक्षात गुजरातमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरटी मासिक खर्च कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन या सरकारी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, 1999-2000 या वर्षात ग्रामीण भागातील गुजरातमधल्या जनतेचा महिन्याकाठी खर्च करण्याची सरासरी देशात चौथ्या क्रमांकावर होती, ती 2012-13 या वर्षात आठव्या क्रमांकावर घसरली आहे. याच कालावधीत शहरी जनतेच्या खर्चाची सरासरी सातव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरली आहे. सध्या गुजरातमधल्या जनतेचं खर्च करण्याचं प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
इतकंच नाही, तर ते उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या जनतेपेक्षाही कमी आहे. याच अहवालातल्या दुसर्‍या निष्कर्षानुसार, राज्यांनी खर्च करण्यामध्येही गुजरातची पीछेहाट झाल्याचं दिसून येतं. राज्ये खर्च करतात याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था सुधारलेली असते असं मानलं जातं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये सर्वाधिक खर्च करणार्‍या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत.

या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागामध्ये केरळची जनता सर्वाधिक खर्च करते. तर शहरी भागामध्ये हरियाणाचे लोक अधिक खर्चिक आहेत. या कालावधीत आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या जनतेच्या सरासरी खर्चामध्ये वाढ झालीये.

  • Samadhan Damdhar

    हा एक अर्थ तज्ञ बोलत आहे का समाज तज्ञ …………. आणि यांच्या मते कोणी पंतप्रधान व्हावे ………..

  • Mohan

    Amartya Sen sir should have talk about country’s economic benefits/loss from Modi not this community issues…

close