शहीद शशांक शिंदेंवर अन्याय : कुटुंबियांचा आरोप

January 24, 2009 4:48 AM0 commentsViews: 86

24 जानेवारी, मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांपैकी चौघांना अशोकचक्र पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. मात्र याच हल्ल्यात सीएसटी स्टेशनवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी शशांक शिंदे यांना अशोकचक्र पुरस्कार न दिल्याबद्दल त्यांच्या पत्नी मानसी शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे. शिंदे यांचं नाव या पुरस्काराच्या यादीतून वगळण्यामागे काहीतरी राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याचबरोबर अशोकचक्र पुरस्कार देताना कोणते निकष लावले गेले याची माहितीही मागण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्यांपैकी 11 जणांना 'अशोकचक्र' जाहीर झालंय. मेजर संदीप उन्नीकृष्णन, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, हवालदार गजेंद्र सिंग, तुकाराम ओंबळे,इन्स्पेक्टर एम.सी.शर्मा, कर्नल जोजन थॉमस, हवालदार बहादुर दोहरा, ओरिसा एसओजी असि.कमांडंट प्रमोद सतपथी, मेघालयचे डीएसपी रेमंड पी. डिंगडोह यांना अशोक चक्र मिळालंय. मात्र शशांक शिंदे यांना या पुरस्कारापासून का वंछित ठेवलं गेलं ? असा त्यांच्या कुटुंबियांचा सवाल आहे. "मला सरकारला एवढंच विचारायचंय की अशोक चक्र पुरस्कारासाठी कोणते निकष लावले गेले ? आणि त्या सर्व निकषांची पूर्तता करत असताना त्यांचं नाव का डावललं गेलं ? सर्वात पहिल्यांदा ते अतिरेक्यांशी लढले. कसाबनेही ते कबूल केलंय. असं असताना त्यांचं नाव का डावललं गेलं, याचा जाब सरकारला द्यावा लागेल." असं शशांक शिंदे यांच्या पत्नी मानसी शिंदे यांनी स्पष्ट केलं.शशांक शिंदे यांना डावललं गेल्याबद्दल त्यांची मुलगी आदिती शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. "बुलेट प्रुफ जॅकेट्स कमजोर होती. त्यांच्याकडे पुरेसा शस्त्रसाठा नव्हता. तरीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. जे लढले ते शहीद झाले. इतरांना सस्पेन्ड केलं गेलं. पोलिसांना त्यांच्या कामाची पावती मिळणार नसेल, तर त्यांच्यासाठी प्रेरणा काय असेल ?" असा सवाल आदिती शिंदे यांनी विचारला.

close