‘जे दिलं ते खा नाही तर प्रवेश रद्द करू’

July 22, 2013 7:24 PM0 commentsViews: 499

22 जुलै : बिहारमध्ये मिड डे मिल प्रकरणानंतर देशभरात हा प्रश्न ऐरणीवर आलाय. जळगाव जिल्ह्यात तर विद्यार्थ्यांच्या मुस्काटदाबीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमळनेरमधल्या यशवंत आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय. या आहारात जाड आणि कच्च्या ज्वारीच्या भाकर्‍या दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना जेवणासाठी पुरेशी ताटंसुद्धा नाहीत. त्यामुळे एका ताटात दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना जेवावं लागतंय. इथं पाण्यासाठी फक्त एकच टाकी आहे. तेच पाणी आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातंय. जेवणानंतर पाणी पिण्यासाठी ग्लासही उपलब्ध नसल्यानं या विद्यार्थ्यांना आपलं ताट धुवून त्यातच पाणी प्यावं लागतंय. मुलांना शौचाला जाण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नाही. या आदिवासी मुलांची इतकी पिळवणूक करूनही, बाहेर कुठेही याबाबत बोललात तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकीही शाळेतून दिली जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पण शाळेत सगळं काही आलबेल असल्याचा दावा शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलाय.

close