RTI कार्यकर्त्याची हत्या

July 22, 2013 7:39 PM0 commentsViews: 160

सुधाकर काश्यप,मुंबई

22 जुलै : मुंबईत भांडुपमध्ये आरटीआय कार्यकर्ते वसंत पाटील यांची आज सकाळी घरात घुसून हत्या केली गेली. पाटील यांनी माहिती अधिकारी कायद्याअंतर्गत अनेक महत्वाची माहिती काढली होती. आणि त्यामुळेच पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. पाटील हे भांडुप भाजपचे वॉर्ड अध्यक्ष देखील होते.

आरटीआय कार्यकर्ते वसंत पाटील यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली. पाटील यांच्यावर धारदार शस्रांनी तब्बल 35 वार करण्यात आले. पाटील यांनी आरटीआय कायद्याच्या आधारे त्यांच्या विभागातले माजी नगर सेवक सुरेश शिंदे यांच्या विरोधात महत्वाची माहिती काढली होती. यामुळे त्याचंी हत्या झाल्याचा पाटील यांच्या पत्नीचा आरोप आहे.

भांडुप इथल्या बेकायदेशीर झोपड्या आणि त्या भागात शिव मंदिराची बळकावलेल्या जमिनीबाबत आरटीआयचा वापर करून माहिती काढून पाटील यांनी तक्रारीही केल्या होत्या. आणि यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीवही पाटील यांना होती.

मला पाटील म्हणाले होते, तुम्ही माझ्या सोबत फिरू नका. तुम्हाला ही गोळ्या खाव्या लागतील. शिंदे यांच्याकडून माझ्या ही जीवाला धोका आहे. असं पाटील यांचे मित्र सुनील जोशी यांनी सांगितलं. मात्र, पाटील हे आरटीआय कार्यकर्ते नव्हतेच असा दावा आता पोलिसांनी केला.वसंत पाटील यांचं 2009 ते 2013 असं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. त्यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत.आरोपी आणि पाटील यांच्यात वैयक्तिक भांडण होतीत. त्यातून ही हत्या झालीय असं पोलीस उपायुक्त महेश घुर्ये यांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच पाटील यांच्या हत्येने आरटीआय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

close